
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेली इंधन टंचाईची भीती यामुळे नागरिकांनी आता स्वयंपाकासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे आणि तुटवड्यामुळे नागरिक आता मोठ्या प्रमाणावर विजेवर चालणाऱ्या उपकरणांकडे वळत असल्याचे बाजारपेठेत दिसत आहे.
मुंबई, बंगळुरु, दिल्लीतील विविध विद्युत उपकरणांच्या बाजारपेठेत सध्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या विद्युत उपकरणांची मागणी प्रचंड वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्युत कुकर, विद्युत शेगडी, ओव्हन-टोस्टर-ग्रिल, मल्टी कुकर, विद्युत तवा, एअर फ्रायर, विद्युत स्टीमर आणि हॉट प्लेट्स यांचा समावेश आहे. ग्राहकांकडून विशेषतः विद्युत शेगडीला सर्वाधिक पसंती मिळत आहे, कारण ते गॅसच्या तुलनेत वापरण्यास सुलभ आणि स्वस्त ठरत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने सात मार्च रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केल्यानंतर बाजारात काही प्रमाणात सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक व्यावसायिक ग्राहकांना सिलिंडर मिळवताना अडचणी येत असून, घरगुती ग्राहकांनाही सिलिंडर बुकिंग केल्यानंतर ते वेळेवर मिळतील की नाही, अशी धास्ती लागली आहे. या अनिश्चिततेमुळे ग्राहकांनी खबरदारी म्हणून घरात किमान एक-दोन विद्युत उपकरणे असावीत, यावर भर दिला आहे. केवळ एलपीजीच नव्हे, तर सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्याबाबतही चिंतेचे वातावरण आहे. महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या संकेतांनुसार, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आगामी काळात नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. जर पीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला, तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधील सुमारे तीस लाखांहून अधिक कुटुंबांना स्वयंपाकासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, सीएनजीचा पुरवठा कमी झाल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विशेषतः रिक्षा, टॅक्सी आणि बेस्ट बसेसवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्युत उपकरणांच्या व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या पंधरा दिवसांत विक्रीमध्ये वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या उपकरणांवर सवलतीही जाहीर केल्या आहेत. जर पुढील काही दिवस गॅस दरवाढ आणि तुटवड्याची स्थिती अशीच राहिली, तर ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.