दहा लाख सौर कृषिपंप कार्यान्वित

राज्याने देशात सर्वाधिक दहा लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आहे. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून अत्यंत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल चौसष्ट टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. देशात आतापर्यंत पंधरा लाख बासष्ट हजार दोनशे एकोणतीस सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल दहा लाख चारशे बहात्तर कृषी पंपांचे वाटप एकट्या महाराष्ट्रात झाले आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये मिळून छत्तीस टक्के कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत.

जागतिक विक्रमाची सुवर्ण नोंद

महाराष्ट्राने महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषिपंप ही योजना राबवली. याआधी राज्यात एकाच महिन्यात तब्बल पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले होते. या अद्वितीय कामगिरीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. या योजनेत महाराष्ट्र दहा लाख चारशे बहात्तर पंपांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल हरियाणा एक लाख नव्वद हजार, राजस्थान एक लाख सत्तावीस हजार, उत्तर प्रदेश एक्काहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस, झारखंड एकसष्ट हजार चारशे बाहत्तर आणि गुजरात एकवीस हजार आठशे चौऱ्याण्णव या क्रमांकावर आहेत.

शेतकऱ्यांना अत्यल्प दरात लाभ

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के आणि अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकऱ्यांसाठी फक्त पाच टक्के लाभार्थी हिस्स्यावर तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. या सौरपंपाच्या पॅनेल्समधून पुढील पंचवीस वर्षे अखंडित वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत दहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांची वीजबिलांच्या आर्थिक विळख्यातून कायमची मुक्तता झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता शेतीसाठी दिवसा आणि अखंडित वीजपुरवठा मिळणे शक्य झाले असून, रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्याच्या त्रासापासून दिलासा मिळाला आहे.

सुरक्षितता आणि अतिरिक्त व्यवसायाची संधी

सौर ऊर्जेच्या वापरामुळे शेतातील विद्युत अपघातांचा धोका पूर्णपणे कमी झाला आहे. या सौर पॅनेल्समुळे शेतातील सिंचनासह शेत घरातील विविध विद्युत उपकरणे, भ्रमणध्वनी संच चार्जिंग करणे आणि विजेवर चालणारी वाहने चार्जिंग करणेही शेतकऱ्यांना सहज शक्य झाले आहे. तसेच सिंचन करून शिल्लक राहिलेल्या विजेच्या आधारे शेतकऱ्यांना गावपातळीवर छोटे कृषिपूरक अन्य व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या बहुउद्देशीय सुविधेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीला गती मिळत आहे.

तक्रार निवारण आणि विमा संरक्षण

सौर कृषी पंप योजनेतील प्रत्येक सौरपंपाला पुरवठादार कंपनीकडून पाच वर्षांची पूर्ण हमी देण्यात आली आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत सर्व प्रकारची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पुरवठादार एजन्सीवर बंधनकारक करण्यात आली आहे. यासोबतच सोलर पॅनेल्स आणि पंपांचे होणारे नुकसान, नैसर्गिक आपत्ती तसेच चोरीविरोधी संपूर्ण विमा संरक्षणही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सौर कृषिपंपाबाबत काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना महावितरणचे भ्रमणध्वनी उपयोजन आणि संकेतस्थळ, चोवीस तास सुरू राहणारे विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आणि संबंधित पुरवठादार कंपनीच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
20,668 वेळा पाहिलं