
बांगलादेशात सध्या गोवर या आजाराने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आशियाई देशांना, विशेषतः भारताला सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारताची सीमा बांगलादेशला लागून असल्याने सीमावर्ती भागात संसर्गाचा धोका वाढला असून आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, बांगलादेशातील चौसष्ट पैकी अठ्ठावन्न जिल्ह्यांमध्ये गोवरचा प्रसार झाला आहे. १५ मार्च २०२६ पासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून सुमारे एकोणवीस हजार संशयास्पद रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एकूण रुग्णांपैकी एक्क्याण्व टक्के मुले ही एक ते चौदा वर्षे वयोगटातील आहेत. राजधानी ढाका, चट्टोग्राम आणि राजशाही यांसारख्या शहरांमध्ये रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत.
बांगलादेशात यापूर्वी लसीकरणाचा दर चांगला होता. मात्र, २०२४ आणि २०२५ या काळात राजकीय अस्थिरता, आरोग्य कर्मचाऱ्यांचे संप आणि निधीची कमतरता यामुळे नियमित लसीकरण मोहिमेत अडथळे आले. यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्तीत तफावत निर्माण झाला. ज्या मुलांनी लसीचा एकही डोस घेतला नव्हता किंवा ज्यांचे डोस अपूर्ण होते, त्यांना या संसर्गाचा फटका सर्वाधिक बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला सतर्क राहण्यास सांगितले आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान लोकांची ये-जा असते. विशेषतः पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत. ढाका आणि सिलहट ही शहरे आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुख्य केंद्रे आहेत, जिथून संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. गोवर हा जगातील सर्वात वेगाने पसरणाऱ्या विषाणूंपैकी एक आहे. एका बाधितामुळे अनेक निरोगी व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो.
गोवर हा केवळ साधा ताप नसून तो जीवघेणा ठरू शकतो. या आजारामुळे न्यूमोनिया, मेंदूदाह आणि कायमस्वरूपी अंधत्व येण्याचा धोका असतो. यावर कोणताही विशिष्ट औषधी उपचार उपलब्ध नसल्याने लसीकरण हाच एकमेव आणि प्रभावी मार्ग आहे. भारताने २०२६ पर्यंत गोवर आणि रुबेला निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारताचे पहिल्या डोसचे लसीकरण त्र्याण्णव टक्के आणि दुसऱ्या डोसचे ब्याण्णव टक्के इतके आहे, जे बांगलादेशच्या तुलनेत बरेच उत्तम आहे. ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञांच्या मते, भारतात लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्याने राष्ट्रीय स्तरावर महामारी येण्याची शक्यता कमी असली, तरी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना संशयास्पद रुग्णांची तपासणी वाढवण्याचे आणि लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना डोस देण्याचे निर्देश दिले आहेत.