हिंजवडी आयटी पार्कमध्ये एलपीजी टंचाई – फूड कोर्टवर परिणाम
व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक कंपन्यांनी फूड कोर्ट आणि कॅफेटेरिया बंद ठेवले आहेत. यावर मात करण्यासाठी बड्या आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे अनेकांनी वर्क फ्रॉम होमची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कॅम्पसमध्ये हजारो कर्मचारी दररोज जेवण आणि नाश्त्यासाठी फूड कोर्टवर अवलंबून असतात. गॅस पुरवठा खंडित झाल्याने या कंपन्यांच्या कँटीनमध्ये मोठ्या प्रमाणावर जेवण बनवणे अशक्य झाले आहे. एका नामांकित आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे कळवले आहे की, पुरवठादारांकडून गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने कॅम्पसमध्ये केवळ मर्यादित खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास घरून डबा घेऊन यावा.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतीत झालेली वाढ आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत आपला बहुतांश गॅस पुरवठा आयात करतो. सध्याच्या युद्धामुळे व्यावसायिक सिलिंडरचे दर केवळ वाढलेच नाहीत, तर त्यांचा साठाही मर्यादित झाला आहे. घरगुती गॅस पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने व्यावसायिक पुरवठ्यावर निर्बंध आणल्याची चर्चा आहे, ज्याचा थेट परिणाम आता कॉर्पोरेट क्षेत्रावर होत आहे.
फूड कोर्टमध्ये जेवण मिळत नसल्याने आणि कँटीनमध्ये केवळ चहा-कॉफी किंवा पाकीटबंद पदार्थ मिळत असल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः जे कर्मचारी बॅचलर आहेत किंवा पीजीमध्ये राहतात, त्यांना घरून डबा आणणे शक्य नाही. परिणामी, आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आणि वैयक्तिक कर्मचाऱ्यांनी कंपन्यांकडे पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम देण्याची मागणी लावून धरली आहे. जेवणच मिळणार नसेल, तर ऑफिसला येऊन काम कसे करायचे, असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. केवळ आयटी पार्कच नव्हे, तर हिंजवडी आणि वाकड परिसरातील लहान हॉटेल्स आणि मेस चालकांनाही या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. अठराशे रुपयांना मिळणारा कमर्शियल सिलिंडर आता चढ्या दराने विकला जात असून तो मिळवणेही जिकिरीचे झाले आहे. अनेक उपहारगृहांनी गॅस अभावी आपले मेन्यू कार्ड मर्यादित केले आहे.