नवी मुंबई विमानतळाभोवती मेट्रोचे जाळे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून जोडण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. नुकतेच सिडकोने पाच हजार पाचशे सत्तावन्न कोटी रुपयांचा एक महत्त्वाकांक्षी मेट्रो प्लॅन तयार केला असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळाभोवती मेट्रो मार्गिकांचे एक सक्षम वर्तुळ तयार होणार आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन प्रस्तावात दोन प्रमुख मार्गिकांचा समावेश आहे.ससध्या सुरू असलेल्या बेलापूर-पेंधर मधील त्रुटी दूर करून तिला अधिक व्यापक बनवण्यासाठी हा विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे खांदा कॉलनी आणि तळोजा परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल. मेट्रो मार्गिका दोन, बेलापूर ते सागर संगम ही मार्गिका बेलापूरला थेट सागर संगम आणि पुढे विमानतळाशी जोडणार आहे. यामुळे बेलापूर हे एक मोठे ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे पाच हजार पाचशे सत्तावन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सिडकोने या मार्गिकांची आखणी अशा प्रकारे केली आहे की, प्रवाशांना नवी मुंबईतील कोणत्याही भागातून विमानतळावर पोहोचण्यासाठी किमान वेळ लागेल. या मार्गिका केवळ अंतर्गत वाहतूक सुधारणार नाहीत, तर मुंबई मेट्रो मार्गिका आठला देखील जोडल्या जातील. बेलापूर, खारघर, पेंधर, सागर संगम आणि उलवे या नोड्समधील प्रवाशांना आता रेल्वे किंवा बसवर अवलंबून न राहता थेट मेट्रोने विमानतळ गाठता येईल.
नवी मुंबई मेट्रो मार्गिका एक बेलापूर ते पेंधर आधीच सुरू झाली आहे. मात्र, विमानतळ सुरू झाल्यावर तिथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असेल. हे लक्षात घेऊन, सिडकोने बहुविध वाहतूक दळणवळणावर भर दिला आहे. सागर संगम स्थानक एक महत्त्वाचे जंक्शन ठरेल, जिथून प्रवासी विमानतळाच्या टर्मिनलकडे वळू शकतील. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारी मार्गिका आठ याच मार्गावरून जाणार असल्याने, सिडकोच्या या अंतर्गत मेट्रो मार्गिका तिला जोडणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील घरांच्या किमती आणि व्यावसायिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः उलवे आणि खारघर परिसरातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये यामुळे सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. राज्य सरकारची मंजुरी मिळताच या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल.