अहिल्यानगरमध्ये क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आपला नवीन क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारणार आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या औद्योगिक नकाशावर एक मानाचा तुरा रोवला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.
डीआरडीओच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची सुमारे सहाशे एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा प्रकल्प संरक्षण विभागाच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असल्याने, त्यासाठी शहरापासून दूर पण दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर अशा जागेची निवड करण्यात आली आहे. महसूल विभागाने या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया वेगवान केली असून, तांत्रिक बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात आहे. कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊनच ही जागा निश्चित करण्यात आली आहे. या नवीन क्षेपणास्त्र प्रकल्पा मुळे भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र निर्मिती क्षमतेत मोठी वाढ होईल. येथे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांची बांधणी आणि चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेतंर्गत संरक्षणाचे सुटे भाग आणि पूर्ण यंत्रणा भारतातच तयार करण्यावर भर दिला जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा प्रकल्प पाहिला जात आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पामुळे केवळ देशाचे संरक्षणच मजबूत होणार नाही, तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. डीआरडीओ सारख्या संस्थेमुळे उच्च तंत्रज्ञान असलेल्या उद्योगांचे जाळे या परिसरात निर्माण होईल. रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास होईल. राहुरी आणि आसपासच्या तालुक्यातील तरुणांना तांत्रिक शिक्षण आणि रोजगारात प्राधान्य मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. जरी विद्यापीठाची जमीन या प्रकल्पासाठी दिली जात असली, तरी त्याचा मोबदला आणि पर्यायी सुविधा विद्यापीठाला मिळणार आहेत. कृषी संशोधन आणि देशाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याने समन्वय साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या परिसरातील सुरक्षेतही वाढ होईल.