
पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धाचा थेट परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर झाला असून, विशेषतः घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत देशाला संबोधित केले. देशाने घाबरून जाण्याचे कारण नाही, सरकारकडे पुरेसा ऊर्जा साठा उपलब्ध आहे, असे आश्वासन देत त्यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेत स्पष्ट केले की, व्यावसायिक जहाजांवरील हल्ले आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांची नाकेबंदी पूर्णपणे अस्वीकार्य आहे. या अडथळ्यांमुळे भारताच्या आयातीवर परिणाम झाला असला, तरी सरकार पर्यायी मार्ग आणि स्रोतांचा शोध घेत आहे.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सरकारद्वारे उचलण्यात आलेल्या पावलांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताकडे सध्या त्रेपन्न लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाचा आपत्कालीन साठा असून, तो पासष्ट लाख टनांपर्यंत वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारत आता केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता अमेरिका, अर्जेंटिना आणि रशिया यांसारख्या एक्केचाळीस देशांकडून इंधन आयात करत आहे. अर्जेंटिनाकडून होणारी एलपीजी आयात मागील तीन महिन्यांत दुपटीने वाढली आहे. देशातील रिफायनरीजमधील उत्पादन पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आले असून, इथेनॉल मिश्रणमुळे दरवर्षी चार पूर्णांक पाच कोटी बॅरल तेलाची बचत होत आहे.
देशात अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्याच्या बातम्या येत आहेत. यावर बोलताना मोदी म्हणाले, आमच्या सरकारचा मुख्य उद्देश हा आहे की, देशातील सामान्य कुटुंबांना आणि माता-भगिनींना स्वयंपाकाच्या गॅससाठी त्रास होऊ नये. सरकारने सध्या घरगुती गॅस ग्राहकांना प्राधान्य दिले असून, व्यावसायिक वापराच्या गॅसवर काही प्रमाणात मर्यादा आणल्या आहेत. तसेच, काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी देशाला सावध केले की, या युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो. हे युद्ध केवळ दोन देशांमधील नाही, तर याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. अशा वेळी आपण सर्वांनी कोविड काळाप्रमाणे एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. भारताने आतापर्यंत युद्धभूमीतून तीन पूर्णांक पंच्याहत्तर लाखांहून अधिक भारतीयांना सुखरूप बाहेर काढले असून, इराणमध्ये अडकलेल्या एक हजार भारतीयांचीही सुटका करण्यात आली आहे.