राज्यात मान्सूनचे आगमन वेळेत
यंदा राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचे चित्र आहे. त्यामुळे जून महिन्यात सुरु होणारा मान्सूचे वेळापत्रक कसे असेल याची उस्तुकता होती. यावर्षीही मान्सूनचे वेळेत आगमन होईल. मात्र, पावसाचे वितरण असमान असेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस केरळमध्ये वेळेत हजेरी लावेल आणि तो महाराष्ट्रातही वेळेत पोहोचेल. मात्र, राज्याच्या काही जिल्ह्यांत जूनमध्ये पाऊस दमदार सुरुवात करणार असला तरी, अनेक भागात पावसाच्या प्रतीक्षा राहील.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने राज्याचा बहुतांश भाग व्यापणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला चांगला पाऊस होईला. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची वाट पाहावी लागेल. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांची दिशा बदलल्यामुळे मध्य भारताला मिळणाऱ्या पावसात तफावत निर्माण होणार आहे. पावसाच्या या असमानतेचा सर्वाधिक फटका शेतीला बसेल. पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या जाण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या यामाहितीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. पुणे शहरात अवकाळी पावसाचे आगमन झाले असले तरी धरण साठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरण साखळीत पावसाचा जोर कमी आहे. शहरात रिमझिम पाऊस होत असला तरी, घाटमाथ्यावर जोराचा पाऊस नसल्याने पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. प्रशासनाकडून पाणी बचतीचे आवाहन करण्यात येत आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू शकतो. यंदा कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचे वितरण असमान असल्यामुळे राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.