मुंबई महापालिकेत नऊ हजार जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू
मुंबई महानगरपालिकेत सध्या तब्बल छप्पन हजार एकशे सव्वीस पदे रिक्त आहेत. त्यापैकी सुमारे नऊ हजार पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तर हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेतील नोकरभरतीची मागणीने जोर धरला होता.
पालिकेच्या विविध विभागांमध्ये मंजूर असलेल्या एकूण पदांची संख्या एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे छप्पन इतकी आहे. मात्र, सध्या यापैकी केवळ एकोणनव्वद हजार एकशे तीस कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत आहेत. उर्वरित छप्पन हजार एकशे सव्वीस पदे रिक्त असल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर आणि नागरी सुविधा पुरवण्यावर मोठा ताण येत आहे. सध्या पालिकेतील विविध संवर्गातील एकूण नऊ हजार दोनशे पंच्याण्णव पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यापैकी पाच हजार चारशे सेहेचाळीस पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित पदे भरण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालिकेच्या गरजेनुसार आणि कामाची निकड लक्षात घेऊन ही पदे टप्प्याटप्प्याने भरली जातील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील मेगाभरतीचा संदर्भ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सेवा प्रवेश नियमावली सुधारणे संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात सत्तर हजार नवीन पदांची भरती प्रक्रिया नवीन पद्धतीने राबवली जाईल, असे जाहीर केले होते. एकीकडे रिक्त पदे भरण्याची मागणी होत असताना, दुसरीकडे पालिका प्रशासन महसुली खर्च कमी करण्यासाठी काही पदे कमी करण्याच्या विचारात आहे. आजच्या संगणकीय युगात कामाच्या पद्धती बदलल्या आहेत, त्यामुळे जुन्या आस्थापनीय रचनेचा फेरआढावा घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.