नासाकडून आर्टेमिस दोन या मोहिमेचे नवीन वेळापत्रक जाहीर

चंद्राला प्रदक्षिणा घालणाऱ्या नासाच्या मानवी मोहिमेसाठीची प्रतीक्षा थोडी लांबली आहे. आर्टेमिस दोन या ऐतिहासिक मोहिमेसाठी नासाने आता एक एप्रिल २०२६ ही नवीन प्रक्षेपणाची तारीख निश्चित केली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये पार पडलेल्या दोन दिवसांच्या फ्लाइट रेडीनेस रिव्ह्यू नंतर गुरुवारी या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

नासाच्या माहितीनुसार, एक एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनीटांनी प्रक्षेपणाची पहिली संधी असेल. काही तांत्रिक कारणास्तव एक एप्रिलला प्रक्षेपण शक्य न झाल्यास, एप्रिल महिन्यातच इतर सहा राखीव दिवस उपलब्ध असतील. यामध्ये दोन एप्रिल, तीन एप्रिल, चार एप्रिल, पाच एप्रिल, सहा एप्रिल आणि तीस एप्रिल या तारखांचा समावेश आहे. गेल्या काही आठवड्यांपासून स्पेस लाँच सिस्टम रॉकेटमध्ये जाणवलेल्या हायड्रोजन गळती आणि हेलियम प्रवाहाच्या समस्यांमुळे हे प्रक्षेपण मार्चवरून एप्रिलमध्ये ढकलण्यात आले आहे. १९ मार्च रोजी रॉकेट पुन्हा एकदा लाँच पॅडवर नेण्यात येईल. या मोहिमेत चार अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन सहभागी होणार आहेत. पन्नास वर्षांनंतर प्रथमच मानवी पाऊल चंद्राच्या जवळ जाणार असल्याने सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.

२०२२ च्या आर्टेमिस एक मोहिमेदरम्यान ओरियन अंतराळ यानाच्या हिट शील्डला काही तडे गेले होते. आर्टेमिस दोन मध्येही तशाच प्रकारचे हिट शील्ड वापरले जात असल्याने नासाने अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी यानाच्या परतण्याच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आर्टेमिस एक मध्ये यान गमावण्याची शक्यता एकशे पंचवीसमध्ये एक इतकी होती. आर्टेमिस दोन ही दुसरीच उड्डाण चाचणी असल्याने जोखीम आहे. मात्र, मागील अनुभवातून मिळालेल्या माहितीमुळे ती कमी करण्यात आली आहे. मिशन मॅनेजमेंट टीमचे प्रमुख जॉन हनीकट यांनी नमूद केले की, आम्ही शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही, पण पहिल्या उड्डाणापेक्षा आता आमची तयारी अधिक भक्कम आहे. आर्टेमिस दोन ही साधारण दहा दिवसांची मोहीम असेल. यामध्ये अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर सुखरूप परततील. हे उड्डाण यशस्वी झाल्यास आर्टेमिस तीन आणि चार मोहिमेचा मार्ग मोकळा होईल, ज्याद्वारे मानवाला पुन्हा एकदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचे उद्दिष्ट आहे. नासाचे प्रशासक जेरेड इसाकमॅन यांनी अलीकडेच या कार्यक्रमात काही मोठे बदल केले आहेत, जेणेकरून मोहिमेचा वेग वाढवून जोखीम कमी करता येईल. या नवीन बदलांनुसार, चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याची मोहीम आता आर्टेमिस चार मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
4,120 वेळा पाहिलं