
नेपाळच्या राजकीय इतिहासात एक अत्यंत मोठा बदल घडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत, बालेंद्र शाह आणि त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. या निवडणुकीत नेपाळचे अनुभवी नेते आणि माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा दारूण पराभव झाला असून, नेपाळमध्ये आता एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे.
नेपाळच्या राजकारणावर दशकांपासून पकड असलेल्या जुन्या पिढीच्या नेत्यांना मतदारांनी, विशेषतः जनरेशन झेड आणि तरुणांनी पूर्णपणे नाकारले आहे. गेल्या वर्षी झालेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनांनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. यामध्ये बदलाचे वारे स्पष्टपणे दिसून आले. या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे के. पी. शर्मा ओली यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव झाला आहे. झापा-पाच या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या ओली यांना बालेंद्र शाह यांनी सुमारे पन्नास हजार मतांच्या फरकाने धूळ चारली. या मतदारसंघात ओली यांनी १९९० पासून सातपैकी सहा वेळा विजय मिळवला होता. फक्त बालेंद्र शाहच नव्हे, तर त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने संपूर्ण नेपाळमध्ये मुसंडी मारली आहे. दोनशे पंच्याहत्तर सदस्यांच्या प्रतिनिधी सभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला एकशे अडतीस चा आकडा ही पार्टी सहज ओलांडताना दिसत आहे. काठमांडू जिल्ह्यातील सर्व दहा जागांवर राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने विजय मिळवला आहे. नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी यांसारख्या दिग्गज पक्षांना या निवडणुकीत मोठा फटका बसला असून ते तिसऱ्या – चौथ्या क्रमांकावर दिसून आले.
बालेंद्र शाह हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. ते पेशाने स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि प्रसिद्ध रॅपर आहेत. काठमांडूचे महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका, पारदर्शकता आणि सुशासनाचे आश्वासन यामुळे ते नेपाळी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आता ते नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याच्या मार्गावर आहेत. बालेंद्र शाह यांच्या विजयामुळे नेपाळच्या परराष्ट्र धोरणात, विशेषतः भारत आणि चीन यांच्यासोबतच्या संबंधात मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यांनी आपल्या प्रचारात नेपाळ पहिले ही भूमिका मांडली होती. तसेच, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एक पूर्णांक दोन दशलक्ष नोकऱ्यांचे आणि शंभर अब्ज डॉलर्सच्या जीडीपीचे महत्त्वाकांक्षी ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे.