
वॉशिंग्टन हिल्टन येथे २५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित केलेल्या प्रतिष्ठित व्हाईट हाऊस पत्रकार मेजवानीच्या कार्यक्रमात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रथम महिला मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स उपस्थित होते. गोळीबार सुरू होताच सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत वेगाने हालचाली करत सर्व प्रमुख नेत्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले. या हल्ल्यात एका गुप्त सुरक्षा अधिकाऱ्याला गोळी लागून जखम झाली, मात्र त्याने बुलेटरोधक जाकीट परिधान केल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला.
या प्रकरणी सुरक्षा दलांनी कोल टोमस अॅलन नावाच्या एकतीस वर्षांच्या तरुणाला घटनास्थळावरून अटक केली आहे. तो कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी असून, त्याच्याकडून बंदूक, पिस्तूल आणि चाकू यांसारखी अनेक घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीने संपूर्ण देशाचा प्रवास करून या विशेष कार्यक्रमाला लक्ष्य करण्याचा कट रचला होता. तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच संबंधित हॉटेलमध्ये वास्तव्यास होता आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेत त्याने आत प्रवेश मिळवला होता.
हल्ल्याच्या काही मिनिटे आधी आरोपीने आपल्या कुटुंबाला एक सविस्तर जाहीरनामा पाठवला होता, ज्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लेखनात त्याने ख्रिश्चन धर्माविरुद्ध तीव्र द्वेष व्यक्त केला असून सरकारी अधिकाऱ्यांना ठार मारण्याची योजना आखली होती. आरोपीने आपल्या या हिंसक कृत्याचे समर्थन करण्यासाठी धार्मिक आणि वैचारिक कारणे दिली आहेत. तपासादरम्यान असेही स्पष्ट झाले की, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून उग्र विचार मांडत होता आणि समाजातील सद्यस्थितीबद्दल त्याच्या मनात तीव्र असंतोष होता.
माहितीनुसार, त्याचा जाहीरनामा पाहिल्यानंतर अॅलनच्या भावाने कनेक्टिकट राज्यात पोलिसांना फोन केला; मात्र हा कॉल गोळीबाराच्या सुमारे दोन तासांनी करण्यात आला. दरम्यान, अॅलनच्या बहिणीने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने कॅलिफोर्नियामध्ये कायदेशीररीत्या शस्त्रे खरेदी केली होती आणि ती आपल्या पालकांच्या टॉरन्स येथील घरात त्यांच्या नकळत ठेवली होती. वॉशिंग्टन डी.सी.साठीच्या अमेरिकन सरकारी वकिल जीनिन पिरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘आत्तापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, या व्यक्तीचा उद्देश शक्य तितकी हानी आणि विध्वंस घडवून आणण्याचा होता, हे स्पष्ट आहे.’
अॅलनने २०१७ साली कॅलटेक या संस्थेतून पदवी प्राप्त केली होती. तेथे त्याने ख्रिश्चन फेलोशिप आणि नर्फ क्लब या गटांमध्ये सदस्यत्व घेतले होते. त्याने अभियांत्रिकी विषयात पदवी मिळवली आणि त्यानंतर २०२५ साली कॅल स्टेट-डोमिंगेज हिल्स येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. अॅलनने समाज मध्यमावर स्वतःचे वर्णन ‘स्वतंत्र खेळ निर्माता’ असे केले असून त्याने ‘बोअरडम’ नावाचा एक संगणकीय खेळ तयार केला आहे. हा खेळ त्याच्या मते ‘अणू संकल्पनेवर आधारित, कौशल्याधारित आणि अहिंसक प्रकारातील असमान लढाईचा खेळ’ आहे. मात्र या खेळाला शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संज्ञांमध्ये ‘गोळीबारप्रधान’ आणि ‘शूटर’ अशा संज्ञांचाही समावेश होता. अॅलन हा सी टू एज्युकेशन या खासगी संस्थेत काम करत होता, जी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश परीक्षांसाठी तयारी करून देते. त्याला डिसेंबर २०२४ मध्ये या संस्थेने त्याला ‘आदर्श शिक्षक’ म्हणूनही गौरवण्यात आले होते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना आरोपीचे वर्णन एक विकृत आणि आजारी व्यक्ती असे केले आहे. ट्रम्प यांनी माहिती दिली की, आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याच्या बदलत्या वर्तनाबद्दल आधीच पोलिसांना सावध केले होते. आरोपी पूर्वी ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा ठेवणारा होता, परंतु नंतर तो धर्मविरोधी बनला, असेही ट्रम्प यांनी त्याच्या जाहीरनाम्याचा संदर्भ देत सांगितले. यासोबतच, संकटकाळात दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांनी सुरक्षा दलांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
या भीषण घटनेमुळे अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून उच्चस्तरीय कार्यक्रमांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या हा कार्यक्रम तात्पुरता रद्द करण्यात आला असून, आगामी काही दिवसांत तो पुन्हा आयोजित केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. तपास यंत्रणा या हल्ल्यामागच्या सखोल उद्देशाचा शोध घेत असून, आरोपीविरुद्ध अनेक फेडरल गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.