तिलारी खोऱ्यात दुर्मिळ वानराचे दर्शन
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जैवविविधतेचा एक अनमोल ठेवा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या स्लेंडर लोरिस ज्याला मराठीत लाजाळू माकड म्हटले जाते, त्याचे दर्शन झाले आहे. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तिलारी परिसर हा त्याच्या घनदाट जंगलांसाठी आणि हत्ती-वाघांच्या वावरासाठी ओळखला जातो. या भागात रात्रीच्या वेळी वन्यजीव निरीक्षणासाठी गेलेल्या अभ्यासकांना झाडाच्या फांदीवर हा छोटासा प्राणी दिसून आला. अत्यंत लाजाळू स्वभावाचा आणि प्रामुख्याने रात्री सक्रिय राहणारा हा प्राणी सहजासहजी मानवी नजरेस पडत नाही. त्याचे स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ चित्रित करण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. हा प्राणी आकाराने खूप लहान असून त्याचे डोळे गोलाकार असतात. याचे पाय काडीसारखे बारीक असतात, ज्यामुळे त्याला स्लेंडर म्हणजेच डौलदार-बारीक हे नाव पडले आहे. हे प्राणी रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. कीटक, अंडी आणि फळे हे त्यांचे मुख्य अन्न आहे. हे अत्यंत संथ गतीने हालचाल करतात आणि भीतीने किंवा लाजेने डोळ्यांवर हात ठेवतात, म्हणून त्यांना लाजाळू म्हटले जाते. भारतात हे प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आढळतात. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात त्यांचे अस्तित्व असणे हे या भागातील जंगलांच्या समृद्धतेचे लक्षण आहे.
तिलारी हे क्षेत्र सह्याद्री आणि पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग आहे. हे वन्यजीव मार्ग म्हणून ओळखले जाते, जिथून कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांचे वन्यजीव प्रवास करतात. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अंधश्रद्धेमुळे अनेकदा या प्राण्यांची शिकार केली जाते किंवा त्यांच्या अधिवासावर मानवी अतिक्रमणामुळे संकट येते. स्लेंडर लोरिसचे अस्तित्व धोक्यात असून त्याला वाचवण्यासाठी या भागाला अधिक संरक्षण देण्याची मागणी होत आहे.