एक एप्रिलपासून नवे वीजदर लागू

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच, राज्यातील वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत सुखद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरात कपात करण्यास मंजुरी दिली आहे. एक एप्रिलपासून नवीन आणि स्वस्त वीज दर लागू झाले आहेत. यामुळे कडक उन्हाळ्यात एसी, कुलर आणि पंख्यांच्या वाढत्या वापरामुळे येणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील प्रमुख वीज पुरवठादार कंपन्या जसे की बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांच्यासह राज्यभरात कार्यरत असलेल्या महावितरणच्या ग्राहकांनाही या कपातीचा फायदा होणार आहे. आयोगाने या कंपन्यांनी सादर केलेल्या पुनर्विचार याचिका आणि वार्षिक महसूल गरजांच्या अर्जावर सुनावणी घेऊन हा निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या दरवाढीला या निर्णयामुळे ब्रेक लागला आहे. या नवीन दर रचनेनुसार, घरगुती ग्राहकांसाठीच्या वीज दरात सरासरी दहा टक्क्यांपासून ते पंधरा टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. शून्य ते शंभर युनिट या गटातील ग्राहकांसाठी दरात लक्षणीय घट करण्यात आली आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना आधार मिळेल. एकशे एक ते तीनशे युनिट या मध्यम स्वरूपाचा वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठीही प्रति युनिट दरात कपात करण्यात आली आहे. घरगुतीच नव्हे, तर छोटे उद्योग आणि व्यावसायिक गाळ्यांच्या वीज दरातही कपात सुचवण्यात आली आहे, ज्यामुळे उत्पादकतेला चालना मिळण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यापासूनच तापमानाचा पारा चाळीशीच्या पार जाऊ लागला आहे. अशा वेळी विजेचा वापर वाढतो. दरवर्षी उन्हाळ्यात वीज बिल दुप्पट किंवा तिप्पट येत असल्याच्या तक्रारी ग्राहक करत असतात. मात्र, यावर्षी दर कमी झाल्यामुळे वापराचे प्रमाण वाढले तरी एकूण बिलाचा भार गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. भविष्यातील वाटचाल आणि सौर ऊर्जा राज्य वीज नियामक आयोगाने स्पष्ट केले आहे की, राज्याने सौर ऊर्जेच्या खरेदीवर दिलेला भर आणि वीज कंपन्यांच्या कार्यक्षमतेत झालेली सुधारणा यामुळे ही कपात करणे शक्य झाले आहे. येत्या पाच वर्षांत वीज दर टप्प्याटप्प्याने आणखी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेत विजेच्या बाबतीत अधिक स्पर्धात्मक होण्यास मदत होईल.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
21,364 वेळा पाहिलं