रशियाकडून क्युबाला मदतीचे आश्वासन

क्युबावर सध्या भीषण आर्थिक आणि ऊर्जा संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, रशियाने आपल्या या जुन्या मित्रदेशाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, क्युबासाठी अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या तेल पुरवठ्याबाबत रशियाने सध्या तरी कोणतेही स्पष्ट भाष्य करणे टाळले आहे.

क्युबा सध्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. इंधनाच्या अभावामुळे संपूर्ण देशातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. इंधन नसल्यामुळे क्यूबातील मुख्य वीज निर्मिती केंद्रे बंद पडली आहेत. यामुळे राजधानी हॅवानासह अनेक शहरांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीज नसल्यामुळे साठवणूक यंत्रणा कोलमडली असून, अन्नपदार्थ आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिकेने क्यूबावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे इतर देशांकडून मदत मिळवणे क्युबासाठी कठीण झाले आहे.

रशिया आणि क्युबा यांचे संबंध शीतयुद्धाच्या काळापासून अत्यंत दृढ आहेत. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, क्युबा हा रशियाचा धोरणात्मक भागीदार आहे आणि रशिया त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. रशिया अन्नधान्य, औषधे आणि तांत्रिक उपकरणे पाठवून क्युबाला सहकार्य करत आहेरशियन कंपन्या क्युबातील पर्यटन आणि शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहेत. क्युबाने रशियाकडे वारंवार कच्च्या तेलाची मागणी केली आहे. मात्र, रशिया स्वतः युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देशांच्या आर्थिक निर्बंधांचा सामना करत आहे. स्वतःच्या अर्थव्यवस्थेवरचा ताण आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे रशियाने तेल पुरवठ्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

रशिया आणि क्युबा यांच्यातील हे जवळीक अमेरिकेसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. अमेरिकेच्या अगदी जवळ असलेल्या क्यूबावर रशियाचा प्रभाव वाढणे, हे पाश्चिमात्य देशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाते. केवळ रशियाच नाही, तर चीनदेखील क्यूबाच्या पायाभूत सुविधांमध्ये रस दाखवत आहे. यामुळे क्युबा हा पुन्हा एकदा महासत्तांच्या स्पर्धेचे केंद्र बनू शकतो.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
7,500 वेळा पाहिलं