आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील संवेदनशील भागात विशेष बंदोबस्त
आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र आणि राज्य गृहविभागाकडून मिळालेल्या सुचनांनुसार, ठाणे शहर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात हायअलर्ट जाहीर केला आहे. विशेषतः ज्यू धर्मीयांची प्रार्थनास्थळे, इस्रायलशी संबंधित प्रतिष्ठाने आणि शहरातील अतिसंवेदनशील भागांमध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाण्यातील गेट ऑफ हेवन या सिनॅगॉगसह म्हणजे ज्यू प्रार्थनास्थळ इतर धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी या भागात स्थिर चौकी तयार केल्या असून, चोवीस तास सशस्त्र पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. ठाणे शहरासोबतच मुंब्रा, कळवा आणि भिवंडी यांसारख्या संवेदनशील उपनगरांमध्ये विशेष गस्त वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये किंवा अफवा पसरून कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गुन्हे शाखा आणि विशेष शाखा सक्रिय झाल्या आहेत.
युद्ध इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असले तरी त्याचे पडसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर उमटण्याची शक्यता असते. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रक्षोभक पोस्ट, अफवा किंवा युद्धाचे समर्थन-विरोध करणारे आक्षेपार्ह मजकूर पसरू नयेत, यासाठी ठाणे सायबर सेल रात्रंदिवस मॉनिटरिंग करत आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आंतरराष्ट्रीय घडामोडींवरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणारे संदेश फॉरवर्ड करू नयेत. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी देशातील प्रमुख शहरांमध्ये इस्रायली नागरिक किंवा त्यांच्या संस्थांवर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली आहे. ठाणे हे मुंबईला लागून असलेले एक महत्त्वाचे औद्योगिक आणि निवासी केंद्र असल्याने येथे सुरक्षा पुरवणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. केवळ धार्मिक स्थळेच नव्हे, तर गर्दीची ठिकाणे जसे की मॉल्स, रेल्वे स्थानके आणि बस डेपो येथेही साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
ठाणे पोलिसांनी शांतता कमिटीच्या सदस्यांशी आणि विविध धर्मीय नेत्यांशी संवाद साधला असून शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होऊ नये, ही आपली जबाबदारी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ शंभर नंबरवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.