रस्त्यावरील सिग्नलवर पाण्याची फवारणी
विदर्भात उष्णतेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी नागपूरमधील अनेक वाहतूक सिग्नल्सवर हिरव्या जाळ्या उभारण्यात आल्या असून पाण्याच्या सूक्ष्म फवारण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना काही प्रमाणात आराम मिळत आहे. तरी अनेक ठिकाणी उष्णता कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबत तक्रारी समोर येत आहेत.
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून बुधवारी वर्धा येथे सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर नागपूरमध्ये सेहेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. २५ मेपासून तापमानाने उच्चांक गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये सकाळी काहीसे ढगाळ वातावरण असूनही दुपारच्या वेळी सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिकांचे हाल झाले.
गेल्या काही दिवसांत नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांत उष्माघात आणि निर्जलीकरणाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही मृत्यूंची नोंदही झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा चिंताजनकरीत्या वाढला आहे. अकोला येथे पंचेचाळीस अंश सेल्सियस, अमरावती येथे पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सियस, ब्रह्मपुरी येथे पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सियस, चंद्रपूर येथे पंचेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सियस, गडचिरोली येथे पंचेचाळीस अंश सेल्सियस, गोंदिया येथे सेहेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सियस, यवतमाळ येथे चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सियस आणि वाशीम येथे चव्वेचाळीस अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेबाबत सतर्कतेचे इशारे जारी करण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भातील अनेक भागांत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिले असून उष्णतेची लाट आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.