देशातील पहिले पाषाणचित्र संरक्षण उद्यान

लेहमध्ये एका ऐतिहासिक प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. भारताचे पहिले पाषाणचित्र संरक्षण उद्यान लेहमध्ये साकारले जाणार असून, नुकतीच या प्रकल्पाची पायाभरणी झाली. लडाखमधील हजारो वर्षे जुन्या शैलचित्रांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

पाषाणचित्र म्हणजे दगडावर कोरलेली चित्रे किंवा नक्षी. लडाखमध्ये अश्मयुगापासून ते ऐतिहासिक काळापर्यंतची हजारो शैलचित्रे विखुरलेली आहेत. या चित्रांमध्ये प्रामुख्याने शिकार, प्राणी, मानवी आकृत्या आणि धार्मिक चिन्हे कोरलेली आढळतात. ही चित्रे म्हणजे लडाखच्या प्राचीन इतिहासाचा आणि मानवी उत्क्रांतीचा जिवंत पुरावा आहेत. मात्र, हवामान बदल आणि वाढत्या पर्यटनामुळे या दुर्मिळ वारशाचे नुकसान होत असल्याने संवर्धनाची गरज निर्माण झाली होती. लेहजवळील थुक्से परिसरात हे उद्यान उभारले जाणार आहे. या उद्यानाचे मुख्य उद्देश विखुरलेल्या दगडांवरील चित्रांचे एका ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने जतन करणे, हा आहे. याठिकाणी विद्यार्थी आणि संशोधकांना लडाखच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी एक केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल. पर्यटकांना लडाखच्या केवळ नैसर्गिक सौंदर्याचीच नव्हे, तर ऐतिहासिक वारशाचीही माहिती देखील या ठिकाणी मिळेल.

लडाखमधील पाषाणचित्रांना हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. या उद्यानाच्या निर्मितीमुळे या दाव्याला अधिक बळकटी मिळणार आहे. लडाखमध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यात अशा प्रकारचे अनेक पाषाणचित्र आहेत, जे जगातील सर्वात जुन्या कलाकृतींपैकी एक मानले जातात. या उद्यानामुळे लडाखमधील वारसा पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटकांना या उद्यानातून लडाखच्या प्राचीन संस्कृतीचा प्रवास पाहता येईल. यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि लडाख केवळ साहसी पर्यटनासाठीच नव्हे, तर सांस्कृतिक पर्यटनासाठीही ओळखले जाईल. या उद्यानात माहिती केंद्र, प्रदर्शन दालन आणि चालण्यासाठी पायवाटा असतील, ज्यामुळे ऐतिहासिक दगडांना इजा न पोहोचवता त्यांचे निरीक्षण करता येईल. लडाखमधील हे पाषाणचित्र उघड्यावर असल्याने त्यांच्यावर ऊन, वारा आणि पावसाचा थेट परिणाम होतो. तसेच, रस्ते बांधकामाच्या कामांमुळे अनेक ऐतिहासिक दगड नष्ट झाले आहेत. हे नवीन उद्यान अशा धोक्यात असलेल्या कलाकृतींना सुरक्षित आश्रय देण्याचे काम करेल. प्रशासनाने या प्रकल्पासाठी तज्ज्ञ पुरातत्वशास्त्रज्ञांची मदत घेतली असून, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हे संवर्धन केले जाणार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,436 वेळा पाहिलं