केदारनाथचा दरवाजा उघडला

उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध केदारनाथ धामचे दरवाजे आज २२ एप्रिल  रोजी सकाळी आठ वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनुसार मंदिराचे कपाट उघडण्यात आले. दरवर्षी हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे हे मंदिर सहा महिने बंद असते. आजच्या या सोहळ्यामुळे २०२६ च्या चारधाम यात्रेला आता पूर्णपणे गती मिळाली असून, लाखो भाविक बाबा केदारनाथाच्या दर्शनासाठी गढवाल हिमालयाकडे रवाना झाले आहेत. कपाट उघडण्यापूर्वी बाबा केदारनाथ यांची पंचमुखी मूर्ती ऊखीमठ येथील हिवाळी निवासस्थानावरून वाजतगाजत पालखीने केदारनाथ धाममध्ये पोहोचली. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोपचार करून कपाट उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली. याप्रसंगी संपूर्ण मंदिर परिसर ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. मंदिराला फुलांनी अतिशय भव्य आणि आकर्षक रीतीने सजवण्यात आले असून, परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

उत्तराखंड सरकारने आणि रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने यावर्षी यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईल आणि कॅमेरे नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांना आपले फोन बाहेर जमा करावे लागत आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीशिवाय भाविकांना सोनप्रयागच्या पुढे जाण्यास परवानगी दिली जात नाही. पंच्चावन्न वर्षांवरील भाविक आणि ज्यांना आधीपासून काही आजार आहेत, अशा भाविकांची सक्तीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. केदारनाथची उंची अकरा हजार सातशे पंचावन्न फूट असल्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. या मार्गावर एकशे सत्याहत्त्तर रुग्णवाहिका आणि एम्स ऋषिकेशमार्फत हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे.

यंदाची चारधाम यात्रा एकोणवीस एप्रिल रोजी यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे कपाट उघडल्यानंतर सुरू झाली होती. आज केदारनाथचे द्वार उघडले असून, उद्या तेवीस एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे कपाट उघडले जाईल. बद्रीनाथच्या उद्घाटनानंतर चारही धामांची यात्रा पूर्ण क्षमतेने सुरू होईल. खराब हवामानाचा धोका लक्षात घेऊन वाहनांच्या वाहतुकीची वेळ सकाळी चार ते रात्री दहा अशी मर्यादित ठेवण्यात आली आहे. केदारनाथ मंदिराचे कपाट उघडणे हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिक सोहळा मानला जातो. प्रतिकूल हवामान आणि अवघड चढण असूनही भाविकांच्या श्रद्धेचा ओघ कायम आहे. राज्य सरकारने केलेल्या चोख नियोजनामुळे यावर्षीची यात्रा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाबा केदारच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक केदारपुरीत पोहोचत असून, पूर्ण परिसर शिवमय झाला आहे.






18,078 वेळा पाहिलं