मुंबई – बंगळुरूदरम्यान ‘वंदे भारत’ शयनयान सेवा

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांचा प्रवास आता अगदी सुखकारक होणार आहे. बंगळुरू ते मुंबईदरम्यान ‘वंदे भारत’ शयनयान रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे. या बाबतची अधिकृत माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि. १७ मे रोजी माहिती दिली. बंगळुरू–मुंबई मार्गावरील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरू–मुंबई नवीन द्रुतगती रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवताना ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कर्नाटकातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वेविषयक मागण्या केंद्र सरकारकडून वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी देण्यात येत असल्याचेही त्यांनी या वेळी प्रामुख्याने नमूद केले.

मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून भारतीय रेल्वेकडून आधुनिक आणि जलद प्रवास सुविधा उपलब्ध करण्यावर विशेष भर दिला जात आहे. नव्या ‘वंदे भारत’ शयनयान सेवेमुळे प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. ही रेल्वे बंगळुरूच्या क्रांतीवीरा संगोळी रायण्णा स्थानकातून सुटून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही ‘वंदे भारत’ शयनयान रेल्वे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असणार आहे. पूर्ण वातानुकूलित डबे, स्वयंचलित दरवाजे, आधुनिक शौचालये, माहिती प्रणाली, प्रवाशांसाठी वाचन दिवे, भ्रमणध्वनी विद्युत भारण सुविधा आणि अधिक सुरक्षित प्रवासासाठी प्रगत कवच संरक्षण यंत्रणा या रेल्वेत असणार आहेत. भारतीय रेल्वेने देशभरात अशा अनेक शयनयान ‘वंदे भारत’ गाड्या सुरू करण्याची योजना आखली असून, आगामी काळात दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात मोठा बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, बंगळुरू आणि मुंबईदरम्यान सुरू असलेल्या नवीन द्रुतगती रेल्वे सेवेलाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नव्या रेल्वे सेवांमुळे दोन्ही महानगरांतील उद्योग, व्यापार, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः दोन्ही राज्यांत नियमित प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी ही सेवा अधिक उपयुक्त आणि फायदेशीर ठरणार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,827 वेळा पाहिलं