गेल्या पाच वर्षांत बेस्ट बसचे शंभर मार्ग बंद – मुंबईकर हवालदिल
मुंबईतील बेस्ट बसचे शंभर हून अधिक बसमार्ग बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना दररोज प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसची कमी संख्या आणि मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याच्या नावाखाली केलेली कपात यामुळे मुंबईकरांचा बस प्रवासासाठीचा प्रतीक्षा कालावधी आता पंचेचाळीस मिनिटांच्या पुढे गेला आहे.
एकेकाळी बेस्टच्या ताफ्यात पाच हजार बसेस होत्या आणि त्यातून पंच्चावन्न लाख प्रवासी दररोज प्रवास करत असत. मात्र, आता ही संख्या निम्म्यावर आली आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ दोन हजार सातशे सदुसष्ट बसेस आहेत, त्यापैकी केवळ दोनशे एकोणपन्नास बसेस बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. उर्वरित दोन हजार पाचशे अठरा बसेस भाडेतत्त्वावर चालवल्या जात आहेत. बसच्या या कमतरतेमुळे प्रवाशांची संख्याही घटून आता तेवीस लाखांपर्यंत खाली आली आहे. हे सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने चिंतेचे लक्षण आहे.
बेस्टने सुसूत्रीकरणाच्या नावाखाली वांद्रे, सायन, प्रभादेवी, माहीम आणि नवी मुंबईला जोडणारे अनेक महत्त्वाचे मार्ग रद्द केले आहेत. पाचशे तीन, सी-बावन्न, पाचशे अकरा आणि ए-पाचशे चार यांसारख्या गर्दीच्या मार्गावरील बसेस कमी केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी, स्थानिकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी किंवा रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी तासनतास बसची वाट पाहावी लागत आहे. मेट्रो स्थानकांना निवासी सोसायट्या आणि व्यावसायिक केंद्रांशी जोडणारे मार्ग वाढवण्याची गरज आहे. बीकेसी, पवई, गोरेगाव आणि विक्रोळी यांसारख्या व्यावसायिक ठिकाणांना मेट्रोशी जोडणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. वाहतूक तज्ज्ञ ए. व्ही. शेनॉय यांच्या मते, मुंबईसारख्या शहराला किमान सात हजार बसेसची गरज आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या बसेस क्षमतेच्या फक्त पन्नास टक्के आहेत. त्यांनी सुचवले आहे की, सरकारने त्वरित निधी उपलब्ध करून देऊन सहा महिन्यांत एक हजार बसेस ताफ्यात समाविष्ट करणे आवश्यक आहे. तसेच, इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्याला वेळ लागत असल्याने, तात्काळ पाचशे सीएनजी बसेस खरेदी करणे हा एक प्रभावी पर्याय असू शकतो. आमची मुंबई आमची बेस्टचे समन्वयक विद्याधर दाते यांनी म्हटले आहे की, सध्याची वाहतूक व्यवस्था सामान्य नागरिकांच्या हिताची राहिलेली नाही. मेट्रो प्रकल्पांवर एक लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र तेवीस लाख मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टकडे दुर्लक्ष करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.