रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला गुरुवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. १२ मार्च रोजी, रात्री आठ वाजून एकोणवीस मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर दोन पूर्णांक आठ इतकी नोंदवण्यात आली आहे. मात्र, यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे दहा किलोमीटर खोलीवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मोठा हादरा बसला नाही, मात्र जमिनीला झालेल्या कंपनांमुळे परिसरातील काही नागरिकांना हे जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच रत्नागिरीतील काही भागांतील नागरिक सतर्क झाले. सौम्य धक्के असले तरी, घरांची पडवी किंवा भिंतींना होणारी थरथर जाणवल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक नागरिक आपल्या घराबाहेर मोकळ्या जागेत आले. सुदैवाने, या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा इमारतींचे नुकसान झाल्याची नोंद नाही. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. भूकंपानंतर घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकारच्या सौम्य भूकंपांच्या घटना नैसर्गिक भूगर्भीय हालचालींचा भाग असतात, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रत्नागिरी आणि उर्वरित कोकण किनारपट्टीचा काही भाग भूगर्भीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. यापूर्वीही या भागात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. तथापि, सद्यस्थितीत नोंदवलेला हा २दोन पूर्णांक आठ तीव्रतेचा भूकंप अत्यंत सौम्य स्वरूपाचा असल्याने धोकादायक मानला जात नाही. तरीही, आपत्ती व्यवस्थापन विभाग या घटनेनंतरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.