मुंबईत आठवडाभर पाच टक्के पाणीकपात
मुंबईकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये पुढील आठवडाभर पाच टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. जलबोगद्यांच्या देखभाल-दुरुस्ती आणि क्लोरीनीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, २० एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत हा पुरवठा विस्कळीत राहणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या जलबोगद्यांच्या अंतर्गत स्वच्छतेचे आणि तांत्रिक कामांचे नियोजन पालिकेने केले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमर महाल ते वडाळा आणि अमर महाल ते ट्रॉम्बे या दोन मोठ्या जलबोगद्यांचा समावेश आहे. या कामांतर्गत जलबोगद्यांमधील पाणी शुद्ध करण्यासाठी आणि जंतूंचा नाश करण्यासाठी क्लोरीनीकरण केले जाईल. बोगद्यांची अंतर्गत स्वच्छता करून पाणी वहन क्षमता तपासली जाईल. आवश्यकतेनुसार अतिरिक्त क्लोरीन काढून टाकण्याची प्रक्रिया केली जाईल. या दुरुस्ती कामाचा फटका मुंबईतील मोठ्या लोकसंख्येला बसणार आहे. शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील अनेक वॉर्डमध्ये पाणी कमी दाबाने किंवा कमी प्रमाणात येईल. शहर विभाग अ ,ब, क, ई, फ-उत्तर आणि फ-दक्षिण या प्रभागांमध्ये पाणीकपात असेल. यात दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश आहे. कुर्ला पूर्व, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपरभांडुप आणि मुलुंड या वॉर्डमध्ये पाणी कपात लागू राहील. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या काही भागात तांत्रिक बिघाडामुळे आधीच पाणीपुरवठा विस्कळीत होता. दक्षिण मुंबईतील काही भागात तर पाणी न मिळाल्याने नागरिकांचे हाल झाले होते. प्रशासनाने वेळीच कल्पना न दिल्यामुळे बुधवारी अनेक रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, आता जाहीर केलेली पाच टक्के कपात ही पूर्वनियोजित असून नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
एकीकडे विदर्भात उष्णतेची लाट असताना मुंबईतही तापमानाचा पारा वाढला आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत असतानाच दुरुस्तीसाठी केलेली ही कपात मुंबईकरांच्या नियोजनावर परिणाम करू शकते. विशेषतः झोपडपट्टी बहुल भागात आणि उंच इमारतींमध्ये पाणी चढवण्यासाठी कमी दाबाचा फटका अधिक बसण्याची शक्यता आहे.