केंजळगड किल्ला

केंजळगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. हा किल्ला महादेव डोंगररांगेतील मांढरदेव डोंगरावर वसलेला आहे. जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड भोर गावापासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळावेगळा असा छोटेखानी किल्ला आहे. वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या एका उत्तुंग शिखरावर हा किल्ला वसलेला आहे. उभ्या कातळात खोदून काढलेल्या ५७ पायऱ्या हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. केंजळगडची किल्लेदारी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद मिळते. हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच परिसरात झाली. एकनिष्ठ गोळे घराण्याने या गडासाठी भरपूर योगदान दिले आहे.
केंजळगडास भेट देण्यासाठी प्रथम भोर या गावी जावे लागते. भोरवरुन केंजळगडाच्या पायथ्याच्या कोर्ले गावात जायला हवे. त्यासासाठी 2- 2 तासाच्या अंतरावर बस आहेत. हा १९ कि.मी. अंतराचा प्रवास करून आपण कोर्ले गावात उतरायचे येथून चालण्यास सुरुवात करावी.
साधारण दीड तासाच्या वाटचालीनंतर केंजळगडाच्या पायथ्याला असलेल्या ‘केंजळमाची’ या गावात पोहोचाल. येथे असलेल्या मंदिरात तुम्ही मुक्काम करू शकता. इथे देवळात मुक्कामाला जागा आहे, .गडावर मात्र रहाण्यास जागा नाही. माचीहून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते. इथूनच दगडात खोदून काढलेल्या प्रशस्त चौपन्न पायऱ्या आहेत. हा एक अतिशय उत्तम कोरीव जिना आहे. डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छिन्नीम लावून व्यवस्थित केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र दरी आहे. या अशा रानात पायऱ्या कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते. त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत.
एका बाजूने पायऱ्या आणि दुसऱ्या बाजूस दरी अशी ही बाट चढताना आपली चांगली दमछाक होते. पायऱ्यांच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंना देवड्याचे अवशेष आहेतगडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर बहुतांश ठिकाणी गवत वाढलेले दिसते. त्यामुळे गडावरून फिरत असताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. वर डावीकडेच एक मध्यम आकाराचे पाण्याचे तळे असून या तळ्यापलीकडे केंजळाई मातेचे छप्पर नसलेले छोटे देऊळ आहे. गडाच्या पश्चिम बाजूला जाताना वाटेवर चुना मळण्याच्या घाणीचे रिंगण आणि दगडी चाक पहावयास मिळते. यावरून या गडावर शिवकाळात बऱ्यापैकी बांधकामे झाली असावीत असे अनुमान आपल्याला काढता येते.
पुढे दगडात बांधलेले दारूकोठाराचे बांधकाम नजरेस पडते. परतीसाठी पलीकडच्या ‘खवली’ गावात उतरून तेथून वाईला जावू शकता. याच डोंगरसोंडेवरुन सरळ रायरेश्वर देवस्थान गाठू शकतो. केंजळगडाच्या भेटीत वाटेवरील ‘कारी’ गावातील कान्होजी जेधेचा ऐतिहासिक वाडा पहायला मिळतो. ‘आंबवडे’ येथील कान्होजी जेधे आणि जिवा महालेंची समाधी पाहता येते.