राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता
राज्यात फेब्रुवारी महिन्यातच थंडीने निरोप घेतला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, यंदाचा उन्हाळा सर्वसामान्यांसाठी अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, मार्च ते मे २०२६ या कालावधीत महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असून उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढणार आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या तापमानात लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः चार मार्चनंतर राज्याच्या अनेक भागांत पारा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवेल. मुंबईतही आर्द्रतेमुळे उकाडा वाढणार असून रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. राज्यात विदर्भ हा नेहमीच उच्च तापमानासाठी ओळखला जातो. मात्र, यंदा मार्चमध्येच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे नागपूर, अकोला, चंद्रपूर यांसारख्या शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार करू शकतो. या भागात उष्ण दिवसांच्या संख्येतही वाढ होणार असून नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केवळ दिवसाचेच नव्हे तर रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहील. याचा अर्थ असा की, यंदा उन्हाळ्यात रात्रीही फारसा गारवा मिळणार नाही. मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात रात्रीच्या उष्म्यात मोठी वाढ होणार असल्याचे चिन्हे आहेत.
प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती सध्या तटस्थ होण्याच्या मार्गावर आहे. फेब्रुवारीत देशात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झाला असून १९०१ नंतरचा हा तिसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. मार्च महिन्यात मात्र विदर्भासह राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाची किंवा ढगाळ हवामानाची शक्यता आहे. यामुळे काही काळ कमाल तापमानात घट होऊ शकते, मात्र ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होऊन उकाडा कायम राहील. आरोग्यासाठी खबरदारीच्या सूचना: वाढत्या उष्म्यामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हवामान विभागाने आणि प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेटेड ठेवावे, दुपारी बारा ते तीन या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, सुती आणि हलके कपडे वापरावेत, प्रवासात पाण्याची बाटली, छत्री किंवा टोपी सोबत ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.