जाहिरातीतून एसटी कमवणार अडीचशे कोटी रुपये
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील पाच वर्षांत जाहिरातींच्या माध्यमातून तब्बल अडीचशे कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
सध्या एसटी महामंडळाला जाहिरातींच्या माध्यमातून वर्षाला साधारण बावीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, नवीन स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवल्यामुळे या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. नवीन करारानुसार, आता हे वार्षिक उत्पन्न सरासरी पन्नास कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे, म्हणजेच उत्पन्नात दुपटीपेक्षा जास्त वाढ अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांसाठी अडीचशे कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा महामंडळाने स्वीकारली आहे. महसूल वाढवण्यासाठी महामंडळाने सर्व संसाधनाचा वापर करण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रामुख्याने बसस्थानक परिसर आणि इमारती, बसेसचा बाहेरील आणि आतील भाग, बसमधील एलसीडी आणि डिजिटल स्क्रीन, उपलब्ध मोकळ्या जागा आणि होर्डिंग्ज यावर जाहीराती झळकतील. एसटीची राज्यात दोनशे एक्कावन्न आगारे आणि सहाशे दहा पेक्षा अधिक लहान-मोठी बसस्थानके आहेत. दररोज सुमारे बारा हजार बसेसद्वारे पन्नास ते पंच्चावन्न लाख प्रवासी प्रवास करतात. भविष्यात नवीन बसेस ताफ्यात आल्यावर ही संख्या एक कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणारी एसटी हे जाहिरातीसाठी सर्वात प्रभावी माध्यम ठरणार आहे, ही माहिती देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या व्यापक जाळ्याचा उल्लेख करत जाहिरातदारांसाठी ही कशी सुवर्णसंधी आहे, हे स्पष्ट केले.
एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीतून जात असून सरकारवर अवलंबून आहे. केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता जाहिरातींसारख्या पर्यायी स्रोतांतून उत्पन्न वाढल्यास महामंडळ तोट्यातून बाहेर येईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. सध्याचे जाहिरात परवानाधारकांचे करार संपल्यानंतर नवीन कंत्राटदारांकडे हे अधिकार सोपवले जातील. या बैठकीत केवळ जाहिरातच नव्हे, तर प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि ताफ्यातील नवीन बसेसबाबतही चर्चा झाली. एसटीच्या मालमत्तांचा व्यावसायिक विकास करून येत्या काळात महामंडळाचे कर्ज फेडण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.