कळवा – मुंब्रा आणि बदलापूर – टिटवाळा आता मेट्रोने जोडले जाणार
ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि उपनगरांना एकमेकांशी जलद गतीने जोडण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पांच्या विस्ताराचा धडाका लावला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत कल्याण – तळोजा मेट्रो आणि ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो मार्गिकांचा विस्तार थेट कळवा, मुंब्रा, बदलापूर आणि टिटवाळ्यापर्यंत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कल्याण-तळोजा या मेट्रो मार्गिकेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, या मार्गाचा विस्तार आता शिळफाट्यावरून पुढे मुंब्रा आणि कळवा मार्गे थेट ठाणे शहराशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास सुलभ होईल आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो पाच मार्गिकेचा विस्तार आता दुर्गाडी नाक्यावरून पुढे कल्याण शहर, उल्हासनगर आणि अंबरनाथमार्गे आगामी चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत केला जाणार आहे. खासदारांनी ही मार्गिका चिखलोलीवरून थेट बदलापूरपर्यंत नेण्याची मागणी केली असून, एमएमआरडीएने यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याणमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुर्गाडी ते टिटवाळा असा नवीन मेट्रो पाच सी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेवरील गर्दी कमी होऊन टिटवाळा भागातील नागरिकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. कांजूरमार्ग – बदलापूर या मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होणार असून, यामुळे बदलापूर ते कांजूरमार्ग हे अंतर मेट्रोने पार करणे शक्य होईल. या बैठकीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनेक मेट्रो मार्गिका या डबल डेकर स्वरूपात विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये खालच्या स्तरावर रस्ता, मधल्या स्तरावर उड्डाणपूल आणि सर्वात वरच्या स्तरावर मेट्रोची मार्गिका असेल. यामुळे भूसंपादनाचा प्रश्न कमी होईल आणि एकाच वेळी रस्ते व मेट्रो वाहतुकीला गती मिळेल.
शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन येथील उड्डाणपुलाचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे पादचारी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल. कटाई नाका येथील बोगद्याचे काम आणि तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादन वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.