राज्य सरकारची सांस्कृतिक वारसा – संस्कृती जतनासाठी ऐतिहासिक पावलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये राज्याचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. विकसित महाराष्ट्र घडवताना आपल्या मुळांशी जोडलेले राहणे महत्त्वाचे आहे, या भावनेतून सरकारने विविध स्मारके, गड-किल्ले आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधी जाहीर केला आहे.

सांस्कृतिक वारसा जतनाचे वीस प्रमुख निर्णय –

१. छत्रपती शिवाजी महाराज वारसा : युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या राज्यातील बारा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष उपाययोजना.

२. शिवसृष्टी विकास : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधीची तरतूद.

 ३. सिंधुदुर्ग राजकोट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी विशेष आर्थिक सहकार्य.

४. आग्रा स्मारक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी निधी.

५. पानिपत मराठा शौर्य स्मारक : हरियाणातील काला अंब येथील मराठा शौर्य स्मारकासाठी सहाय्य.

६. वासोटा किल्ला रोप-वे : सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी ‘मुनावळे ते वासोटा’ रोप-वे प्रकल्प.

७. छत्रपती संभाजी महाराज स्मारक : मौजे तुळापूर येथील स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.

८. वढू बुद्रूक समाधीस्थळ : छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रूक येथील समाधीस्थळाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करणार.

९. संगमेश्वर स्मारक: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर स्मारकाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात असून त्यासाठी निधी जाहीर.

१०. अजिंक्यतारा जतन : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे संवर्धन व जिर्णोद्धार.

११. संगम माहुली संवर्धन : महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन व सुशोभीकरण.

१२. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट : संत गाडगेबाबांच्या दीडशेव्या जयंती वर्षा निमित्त त्यांच्या जन्मगावापासून ते संबंधित सर्व महत्त्वाच्या स्थळांना जोडणारे तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणार.

१३. महात्मा जोतिबा फुले जयंती : ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले यांची दोनशेवी जयंती साजरी करण्यासाठी विशेष कार्यक्रम आणि समितीची स्थापना.

१४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड स्मारक : महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात भाविकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास.

१५. संत तुकाराम महाराज जन्मस्थान : देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाचे जतन व संवर्धन.

१६. तिसरी चित्रसृष्टी : नागपूर येथे राज्याची तिसरी चित्रसृष्टी उभारणार.

१७. कवी कालिदास गौरव : कवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ.

१८. महानुभाव पंथ स्थळे : विदर्भातील विविध महानुभाव पंथीय धार्मिक स्थळांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी.

१९. टेंबर म्युझियम : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सागवान वारसा जपण्यासाठी टेंबर म्युझियम आणि झायलेरियमची स्थापना.

२०. सामाजिक समता वर्ष : २०२६-२०२७ हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय.

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने केवळ भौतिक विकासच नाही, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आहे. गड-किल्ल्यांचे संवर्धन, थोर समाजसुधारकांची स्मारके आणि धार्मिक स्थळांचा विकास यामुळे पर्यटन वाढीसह भावी पिढीला आपल्या इतिहासाची ओळख करून देणे अधिक सुलभ होणार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,259 वेळा पाहिलं