लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला आहे. दोन दिवस चाललेल्या वादळी चर्चेनंतर आणि सत्ताधारी-विरोधकांमधील जोरदार आरोप-प्रत्यारोपांनंतर हा प्रस्ताव नामंजूर झाला. यामुळे ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदी कायम राहिले आहेत.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील एकशे अठरा खासदारांनी ओम बिर्ला यांच्याविरोधात हा अविश्वास प्रस्ताव आणला होता. सभागृहाचे कामकाज चालवताना ओम बिर्ला यांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आणि सत्ताधारी भाजपला झुकते माप देऊन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अनेकदा बोलण्यापासून रोखले जाते आणि त्यांचे माईक बंद केले जातात, असे गंभीर आरोप काँग्रेसने केले होते. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना, चर्चेत सहभागी होण्यापासून राहुल गांधींना रोखल्याचा मुद्दाही उचलण्यात आला होता.

गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर कडाडून टीका केली. त्यांनी या प्रस्तावाला ‘दुर्दैवी’ आणि संसदीय परंपरेला धक्का लावणारे कृत्य असल्याचे म्हटले. सभागृह म्हणजे काही बाजारपेठ किंवा जत्रा नाही, ते नियमांनी चालते, असे खडसावत शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधकांनी उपस्थित केलेले आक्षेप निराधार असून ते केवळ नेत्यांचा अहंकार समाधान करण्यासाठी केलेले राजकारण आहे, असा आरोपही भाजपने केला. अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना, संसदीय पावित्र्य राखण्यासाठी ओम बिर्ला यांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर न बसण्याचा निर्णय घेतला होता. प्रस्ताव फेटाळल्यानंतर गुरुवारी बिर्ला पुन्हा अध्यक्षस्थानी विराजमान झाले. यावेळी त्यांनी विरोधकांना आणि सभागृहाला स्पष्ट शब्दांत सुनावले. लोकसभा ही कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेने नव्हे, तर संसदीय नियमांनुसार चालते. सभागृहातील प्रत्येक सदस्याने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि कोणीही नियमांपेक्षा श्रेष्ठ नाही, असे बिर्ला यांनी ठामपणे सांगितले. माईकच्या वादावर स्पष्टीकरण देताना बिर्ला म्हणाले, माईकचे बटन माझ्या हातात नसते, मी कोणाचेही माईक बंद करत नाही. नियमांचे उल्लंघन न करता कोणीही सदस्य सभागृहात बोलू शकतो. नियम सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वांसाठी समान आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
10,674 वेळा पाहिलं