चहा – अहाहा
“चहाला कॉफीसोबत स्पर्धा करावी लागते,” शिवाय “बहुतांश चहा निर्यात करून केवळ थोड्या प्रमाणातील चहा देशांतर्गत बाजारात पुरवला जात असल्याने भारतातील चहाप्रेमींना चहाचे अतिशय दर्जेदार प्रकार व स्वाद चाखायला मिळत नाहीत,” असं खेदाने म्हटलं जातं. पण मला असं वाटण्या मागचं कारण आपल्याकडच्या प्रांतिक अस्मिता आहेत असं मला वाटतं. थोडं निरीक्षणाने कळलं जे दक्षिण भारतीय कॉफीप्रेमी असतात तर उत्तर भारतीय बहुधा चहाच पिणं पसंत करतात. बाकी मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताला तर दोन्ही प्रिय आहेत अर्था जे खाण्यापिण्याची बंधनं पाळतात ते वगळून. मुंबईत तर तुम्हाला आजकाल नाक्या नाक्यावर येवले, चिपळूणकर यांची अमृततुल्य चहाची हॉटेल्स दिसतील. ही चहा फार लवकर लोकप्रिय ही झाली याला कारण त्यांचं घोषवाक्य जे सहज चाकरमानी मुंबईकरांच्या ओठावर रुळलं ते म्हणजे, “चहाला वेळ नसतो, पण वेळेला चहा हवा.” त्यामुळे चहाची दुसर्या कशाशीही स्पर्धा करण्याची गरज नाही हे तर स्पष्टच आहे.
भारतामध्ये चहा नाही असं एकही घर सापडणार नाही. कारण सकाळ आणि संध्याकाळी चहा पिणं हा आता भारतीयांच्या खाद्य संस्कृतीचा भाग बनला आहे. घरी आलेल्या पाहुण्याला चहा घेण्यासाठी आग्रह नाही केला तर पाहुण्याचा आणि यजमानांचा ही अनादर होतो. असा हा चहा आता भारतातील लोकांच्या आदरातिथ्याचं प्रतीक बनला आहे.
बरं सध्या आपला देश चहाच्या बाबतीत आणखी एका बाबतीत जगभरात लोकप्रिय ठरतो आहे. बरोब्बर. आपले पंतप्रधान हे पूर्वी चहा विकायचे. त्यामुळे देशातील तरुणांच्या मनात सुंदर भविष्याविषयी आशा निर्माण करण्यासाठी, “एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर तुम्ही देखील सर्वोच्च स्थानी बसू शकता,” असं खुद्द पंतप्रधान बोलत असतात. विरोधी पक्षांनी त्यांना हिणवल्यानंतर तर त्यांनी “चाय पे चर्चा’ हा अनोखा उपक्रमच सुरू केला. तर असा हा चहा भारतीयांच्या अत्यंत आवडीचा. इतका की हिन्दी चित्रपटांमध्ये फुललेली शेतं दाखवताना पंजाबच्या सरसों के खेतो नंतर आसामच्या चहाच्या मळ्यांचा आणि त्यात पाठीवर भलं मोठं टोपलं अडकवून चहाची पानं खुडणार्या बायकांचाच नंबर लागतो.
अशा या चहाची केवळ पानांच्या उत्पादनासाठी लागवड केली जाते. भारतातील खासगी उद्योगांत चहाच्या उद्योगाला पहिलं स्थान आहे. भारतात रेल्वेच्या नंतर चहा उद्योगातील कामगारांची संख्या मोठी आहे. हा ताग उद्योगानंतर भारताला सर्वांत अधिक परदेशी चलन मिळवून देणारा उद्योग आहे. भारताला मिळणाऱ्या एकूण परदेशी चलनाच्या पंधरा टक्के चलन चहा उद्योगातून मिळते. ह्या चहाच्या पानांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारच्या चहा तयार केल्या जातात. भारतासह जगातील एकूण सव्वीस देशांत चहाची लागवड करण्यात येते. भारत, चीन, जपान, बांगला देश, श्रीलंका, तैवान, इंडोनेशिया, मलेशिया, पूर्व आफ्रिका (केनिया, मालावी, युगांडा आणि मोझॅंबिक), तुर्कस्तान, ब्राझील, अर्जेंटिना आणि रशिया या देशांमध्ये प्रामुख्याने चहाची लागवड केली जाते.
भारतात सुरुवातीला चहाची लागवड ईशान्य आणि दक्षिणेतील डोंगराळ भागातच झाली. पाण्याचा निचरा चांगला असलेल्या सपाट प्रदेशातील जमिनीतही चहाची झाडं चांगल्या प्रकारे वाढतात असं मागाहून आढळून आलं. त्यात आसाममधील ब्रह्मपुत्रा आणि सुरमा या नद्यांच्या खोऱ्यांमधले प्रदेश आणि प. बंगालमधील दार्जिलिंग, जलपैगुरी, कुचबिहार आणि तराई हे उत्तर भारतातील चहाच्या लागवडीचे प्रमुख प्रदेश आहेत. कांग्रा, कुमाऊँ आणि डेहराडून जिल्ह्यांतही चहाची लागवड होते. आसाममध्ये ७५० मळ्यांत चहाचं क्षेत्र आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात अर्थात ‘आसाम व्हॅली’ मध्ये चहाच्या लागवडीसाठी वातावरण सर्वांत अनुकूल असल्यामुळे जगातील सर्वांत मोठे सलग चहाचं क्षेत्र या भागात आहे. चहाच्या लागवडीसाठी सुरमा खोऱ्यांतील हवामान ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्याइतकं चांगलं नाही. भारताच्या ईशान्य भागात तयार होणाऱ्या चहामध्ये दार्जिलिंग चहा विशेष स्वादयुक्त असतो. चहा हे शरीराला हितकारक आणि उत्साहवर्धक पेय आहे, याबद्दल दुमत नाही. मेंदूपेक्षाही स्नायूंना हे पेय जास्त उत्साहवर्धक आहे. माफक प्रमाणात चहाचं सेवन केल्यास शारीरिक थकवा कमी होतो. चहा स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारा) आणि मूत्रल (लघवी साफ करणारा) आहे. त्यातील टॅनीन पदार्थामुळे जास्त प्रमाणात चहा प्याल्यास अन्नपचन बिघडते, पोषणाच्या दृष्टीने चहाला जवळजवळ काहीच महत्त्व नाही, असं काही तज्ज्ञांचे मत आहे. याउलट काही रशियन शास्त्रज्ञांच्या मते चहापासून पोषणात्मक आणि शरीरक्रियावैज्ञानिक फायदे आहेत. चहात कार्बोहायड्रेट्स आणि स्निग्ध पदार्थ जवळजवळ नसतात. परंतु चहात लेश मूलद्रव्ये, ब जीवनसत्त्व आणि सहाय्यक वृद्धिघटक थोड्या प्रमाणात असतात, ही गोष्ट दृष्टिआड करून चालणार नाही. भारतात तयार होणाऱ्या चहापैकी जवळजवळ निम्मा चहा निर्यात होतो. यापैकी सर्वांत जास्त ब्रिटनला निर्यात होतो. त्या खालोखाल रशियाचा नंबर लागतो. सूदान, इराण, संयुक्त अरब प्रजासत्ताक, अफगाणिस्तान, अमेरिका (संयुक्त संस्थाने), आयरिश प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, प. जर्मनी, इटली, फ्रान्स, कॅनडा हे भारतातून चहा आयात करणारे इतर प्रमुख देश आहेत.