जम्मू – काश्मीरला मुसळधार पावसाचा इशारा

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत पश्चिमी विक्षोभमुळे मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान बदलामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या प्रदेशावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद या क्षेत्रांवर होत आहे. जम्मू विभागातील सखल भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागांत मध्यम ते मुसळधार बर्फवृष्टी होऊ शकते, ज्यामुळे तापमानात घट होईल. पावसासोबतच ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे वाहण्याची आणि विजा कडकडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

या प्रतिकूल हवामानामुळे या डोंगराळ भागात अनेक आव्हाने उभी राहू शकतात. मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात. यामुळे पर्यटकांची आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक विस्कळीत होऊ शकते. सखल भागातील नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. काढणीला आलेल्या पिकांना गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची संख्या वाढू शकते, परंतु खराब हवामानामुळे विमान सेवा आणि रस्ते प्रवासात अडथळे येऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा किंवा सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डोंगराळ भागात प्रवास करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेण्याचे आणि प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीमा रस्ते संघटनेला रस्ते मोकळे ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
23,741 वेळा पाहिलं