पुरंदरमध्ये कांद्याचे दर कोसळले
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वाल्हे आणि आजूबाजूच्या परिसरात यंदा कांद्याचे पीक जोमाने आले आहे. मात्र, बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याला मिळत असलेला कवडीमोल दर आणि साठवणुकीसाठी येणारा वाढीव खर्च यामुळे कांदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे.
वाल्हे, परिंचे, वीर आणि मांडकी या पट्ट्यात कांदा हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. मात्र, सध्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याला प्रति किलो केवळ चार ते बारा रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे. एक किलो कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्याला बियाणे, खते, मशागत, औषध फवारणी आणि मजुरी असा मिळून सुमारे पंधरा ते अठरा रुपये खर्च येतो. सध्या मिळत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचा मूळ खर्चही निघत नाहीये. अनेक शेतकऱ्यांनी कांदा विकून वाहतुकीचा खर्चही निघत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने आणि पाल्याची उपलब्धता असल्याने पुरंदरमध्ये कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले. जास्त प्रमाणात आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. अवकाळी पावसाचे सावट असल्यामुळे शेतकरी आपला माल घाईघाईने बाजारात आणत आहेत, ज्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. केंद्र सरकारच्या धरसोडीच्या निर्यात धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला अपेक्षित मागणी मिळत नसल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. दर सुधारतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तिथेही अडचणींची मालिका संपलेली नाही. कांदा साठवण्यासाठी लाकडी किंवा लोखंडी चाळी उभारणे आता अत्यंत महाग झाले आहे. लोखंड आणि मजुरीचे दर वाढल्याने चाळ बांधणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे साठवलेला कांदा सडण्याचे प्रमाणही वाढले आहे, ज्यामुळे दुहेरी नुकसान होत आहे. या भीषण परिस्थितीतून सावरण्यासाठी पुरंदरमधील शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. कांद्याला तातडीने हमभाव जाहीर करावा. कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात शुल्कात सवलत द्यावी. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना विशेष आर्थिक मदत किंवा अनुदान घोषित करावे, अशा मागण्या शेतकऱ्यांनी शासनाकडे केल्या आहेत.