पिंपरी चिंचवडमध्ये नालेसफाईला वेग
पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये आणि पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे. यासाठी शहरातील नाल्यांची आणि गटारांची सफाई करण्याच्या कामाला प्रशासनाने युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासकांनी या कामाचा आढावा घेत पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात अनेक सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. काही ठिकाणी नाल्यांच्या कडेला असलेल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे नालेसफाईचे नियोजन केले आहे. यामध्ये शहरातील मुख्य नाले, पावसाळी गटारांची स्वच्छता प्रामुख्याने केली जात आहे.
नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने प्रमाणात जेसीपी, पोकलेन आणि इतर अत्याधुनिक यंत्रसामग्री तैनात केली आहे. नाल्यांमधील साचलेला गाळ, कचरा आणि झाडाझुडपांची वाढलेली अडथळे दूर केली जात आहेत. विशेषतः ज्या नाल्यांची रुंदी कमी झाली आहे किंवा जिथे कचरा अडकून पाण्याचा प्रवाह थांबतो, अशा ठिकाणांना प्राधान्य दिले जात आहे. काढलेला गाळ नाल्याच्या कडेला न टाकता तो तातडीने डंपिंग ग्राऊंडवर हलवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नालेसफाईच्या कामात अनेक ठिकाणी नाल्यांलगत झालेली अतिक्रमणे अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बांधकामे किंवा भिंती आल्यामुळे पावसाचे पाणी तुंबते. अशा अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून, सफाई कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. नदीपात्रात जाणारे नाले मोकळे राहतील, याची खबरदारी घेतली जात आहे. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांमध्ये नालेसफाईची कामे एकाच वेळी सुरू करण्यात आली आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील सफाई कामांवर देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही आपल्या परिसरातील तुंबलेल्या नाल्यांबाबत तक्रारी आल्यास, त्याकडे त्वरित लक्ष देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पूर रोखणे हाच उद्देश नसून, नालेसफाईमुळे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ नये आणि साथीच्या रोगांचा प्रसार टाळता यावा, हाही एक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छतेसोबतच औषध फवारणीही केली जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १५ मे पर्यंत ही सर्व कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.