ठाणे महापालिका करणार रोबोटिक नालेसफाई
ठाणे शहराला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आधुनिक निर्णय घेतला आहे. शहरातील नाल्यांमधील कचरा आणि प्लास्टिक काढण्यासाठी आता मानवी श्रमाऐवजी रोबोट वापरले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी मुंबई आयआयटीने विकसित केलेल्या प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून, यामुळे पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुमारे तीनशे किलोमीटर लांबीचे नाले आहेत. हे नाले शहराच्या विविध भागांतून वाहत शेवटी खाडीला जाऊन मिळतात. सध्याची परिस्थिती अशी आहे की, पालिकेकडून दरवर्षी केवळ पावसाळ्यापूर्वी एकदाच नालेसफाई केली जाते. उरलेले आठ महिने नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते, परिणामी नागरिक प्लास्टिक आणि इतर कचरा नाल्यांमध्ये फेकतात. यामुळे नाल्यांचे मुख तुंबते आणि पावसाळ्यात शहरात पूरसदृश स्थिती निर्माण होते. यापूर्वी वर्षातून दोनदा सफाई करण्याचा प्रयत्न झाला होता, पण ती पद्धत फार काळ टिकली नाही.
नाल्यांमधील तरंगता कचरा आणि प्लास्टिक अडवून ते बाहेर काढण्यासाठी मुंबई आयआयटीने एक पेटंट प्राप्त रोबोटिक प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली नाल्याच्या प्रवाहात बसवली जाईल. नाल्यातून वाहून येणारा प्लास्टिक कचरा ही यंत्रणा आपोआप ओळखून तो वेगळा करेल. यामुळे नाल्याचा प्रवाह मोकळा राहील आणि पाणी साचण्याची भीती कमी होईल. ठाणे महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर शहरातील दहा महत्त्वाच्या ठिकाणी आणि खाडीच्या मुखालगत ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
नालेसफाईसोबतच ठाणे पालिकेने कचरा विल्हेवाटीसाठी इतरही प्रकल्पांची घोषणा केली आहे. प्रभिवंडी तालुक्यातील मौजे आतकोली येथे पस्तीस हेक्टर जागेवर शास्त्रोक्त कचराभूमी तयार केली जात आहे. येथे प्रतिदिन सहाशे ते आठशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. तसेच येथे पर्यावरणपूरक कोळसा निर्मितीचा प्रकल्पही सहा महिन्यांत सुरू होईल. गायमुख जकात नाका येथे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारला जात असून त्याची क्षमता सत्त्याण्णव टन प्रतिदिन असेल. घरगुती घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र तीन टन क्षमतेची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाचे रस्ते जसे की पूर्व द्रुतगती मार्ग, घोडबंदर रोड यांची सफाई मशीनद्वारे केली जाते. मात्र, या मशीनवर होणारा इंधनाचा खर्च आणि प्रत्यक्ष होणारी सफाई यांचा ताळमेळ बसत नसल्याची शंका आयुक्त सौरभ राव यांनी उपस्थित केली आहे. या यंत्रणेवर आता अधिक बारीक लक्ष ठेवले जाणार असून इंधन खर्चात बचत आणि कामात पारदर्शकता आणली जाईल.