
मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांची परंपरा मोठी आहे पण आधुनिक काळात जुन्या संगीताचा गोडवा आणि नव्या विचारांची मांडणी यांचा सुवर्णमध्य साधणारे नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी’. भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित या नाटकाने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर जागतिक स्तरावर रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विठ्ठलाची भक्ती, तुकोबांचा विरक्तपणा आणि घराचा गाडा ओढणाऱ्या आवलीची ओढाताण यातून उभा राहणारा हा एक प्रवास आहे.
संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तीत इतके तल्लीन झाले होते की त्यांना स्थळ, काळ आणि संसाराचे भान उरले नव्हते. मात्र त्याच वेळी त्यांची पत्नी अवली म्हणजे जिजाई मात्र संसाराच्या जबाबदाऱ्या मुलांचे संगोपन आणि आपल्या पतीची काळजी घेण्याच्या दुहेरीत अडकली होती. ही कथा सुरू होते देहूच्या डोंगरात जिथे दररोज संध्याकाळी अवली तुकोबांना शोधायला जाते. एका अशाच दुपारी, पतीसाठी जेवण घेऊन जाताना तिच्या पायात रानटी काटा रुततो आणि वेदनेने ती बेशुद्ध पडते.
तिला जाग येते तेव्हा ती आपल्या घरात असते आणि एक अनोळखी स्त्री तिची सुश्रुषा करत असते. ती स्त्री म्हणजे स्वतःला ‘लखुबाई’ म्हणवणारी प्रत्यक्ष रखुमाई असते. हा या नाटकाचा सर्वात महत्त्वाचा ‘टर्निंग पॉईंट’ आहे.
रखुमाई केवळ अवलीला मदत करायला आलेली नसते तर तिच्या मनात एक खोलवर शंका असते. जेव्हा अवली बेशुद्ध पडली होती. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने खाली वाकून एका सामान्य स्त्रीच्या म्हणजे अवलीच्या पायाचा काटा काढला होता. जगाचा नियंता एका सामान्य स्त्रीच्या चरणांना स्पर्श का करतो? तिला विठ्ठलाच्या या कृतीचे उत्तर हवे होते. रखुमाईला वाटले होते की आवलीमध्ये काहीतरी दैवी शक्ती असेल पण प्रत्यक्षात तिला भेटते ती एक साधी, कष्टकरी पण स्वाभिमानी स्त्री!
या नाटकात मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते यांनी आपल्या अभिनयाने जिवंतपणा आणला आहे. आवलीच्या भूमिकेत असलेली चिडचिड, पतीबद्दलची ओढ आणि घरासाठी असलेली तगमग मानसी जोशी यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. तर दुसरीकडे रखुमाईची शांतता, कुतूहल आणि तिचा देवाशी असलेला हळवा संवाद शुभांगी सदावर्ते यांनी आपल्या संयत अभिनयातून सादर केला आहे.
नाटकाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यातील संगीत. ‘संगीत देवबाभळी’ हे नाव सार्थ ठरवताना यात जुन्या अभिजात अभंगांना नव्या चालीत गुंफले आहे. साधे, ओघवते पण हृदयाला भिडणारे संगीत प्रेक्षकांना एका वेगळ्या आध्यात्मिक विश्वात घेऊन जाते. टाळ-मृदंगाच्या गजरात रंगणारे हे नाट्य केवळ धार्मिक न राहता मानवी नात्यांचा शोध घेणारे ठरते.
हे नाटक आपल्याला शिकवते की भक्ती केवळ नामस्मरणात नसते तर ती कर्तव्यातही असते. विठ्ठल तुकोबांच्या कीर्तनात जितका रमतो तितकाच तो आवलीच्या प्रामाणिक संसारातही राबतो. संसाराला कंटाळलेली आवली आणि देवाच्या भक्तीचा हक्क विचारणारी रखुमाई, या दोन स्त्रियांचा संवाद म्हणजे मराठी रंगभूमीला लाभलेली एक कलात्मक देणगी आहे.मराठी मातीतील हा सांगीतिक अविष्कार आता जागतिक स्तरावर पोहोचला असून तो प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी अनुभवावा असाच आहे.