रेडी ऑर नॉट २ – जीवघेणा खेळ

हॉरर आणि कॉमेडीचा एक वेगळाच थरार अनुभवायला देणारा चित्रपट म्हणजे ‘रेडी ऑर नॉट’. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरातील प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले होते. आता याच खेळाचा पुढचा आणि अधिक भयानक टप्पा म्हणजेच ‘रेडी ऑर नॉट २ हिअर आय कम’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी हा अमेरिकन चित्रपट प्रदर्शित होणार असून १ तास ५० मिनिटांचा हा थरार प्रेक्षकांची झोप उडवण्यासाठी सज्ज झाला आहे.

मॅट बेटिनेली-ओल्पिन आणि टायलर गिलेट या जोडगोळीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे अभिनेत्री समारा वीविंग. पहिल्या भागात ‘ली डोमास’ कुटुंबाच्या तावडीतून सुटलेली ‘ग्रेस’ या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा एका जीवघेण्या संकटात अडकणार आहे. ग्रेसला आता खेळाच्या पुढच्या आणि अधिक आव्हानात्मक स्तरावर स्वतःचा जीव वाचवावा लागणार आहे. या प्रवासात तिला साथ देण्यासाठी किंवा तिला अधिक अडचणीत आणण्यासाठी यावेळी कॅथरीन न्यूटन आणि दिग्गज अभिनेता इलिजाह वूड हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. समारा वीविंगचा तोच ‘दुभंगलेला’ लूक आणि तिचा लढाऊ बाणा पुन्हा एकदा पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

कथानकाचा विचार केला तर हा चित्रपट ‘कॉमेडी, हॉरर आणि मिस्ट्री’ अशा तीनही जॉनरचा एक परफेक्ट ब्लास्ट आहे. पहिल्या भागातील घटनांनंतर ग्रेसचे आयुष्य कुठे वळण घेते आणि तिला पुन्हा एकदा अशा कोणत्या रात्रीचा सामना करावा लागतो याचे गुढ या भागात उलगडणार आहे. गाय बुसिक आणि आर. क्रिस्टोफर मर्फी यांनी लिहिलेली ही पटकथा अधिक क्रूर आणि तितकीच उपरोधिक विनोदाने भरलेली असेल असे संकेत मिळत आहेत. चित्रपटाची भव्यता आणि त्यातील रहस्य प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास यशस्वी होईल.

थोडक्यात सांगायचे तर ‘रेडी ऑर नॉट २’ हा केवळ एक हॉरर चित्रपट नसून, तो ग्रेसच्या अस्तित्वाचा संघर्ष आहे. जर तुम्हाला रक्ताळलेला थरार आणि त्यासोबतच काहीसे ‘डार्क ह्युमर’ आवडत असेल तर ३ एप्रिलला सिनेमागृहात हा खेळ पाहणे मिस करू नका. हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही तर काळजाचा ठोका चुकवणारा एक अनुभव ठरेल यात शंका नाही.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,555 वेळा पाहिलं