हायड्रोपोनिक कोथिंबीरीची लागवड
शहराच्या गजबजाटात, उंच इमारतींच्या सावलीत आणि कमी होत चाललेल्या मोकळ्या जागेत शेती करणे ही एकेकाळी अशक्य वाटणारी गोष्ट होती. पण काळ बदलला, तंत्रज्ञान पुढे आले आणि शेतीनेही नवे रूप धारण केले. त्यातूनच जन्माला आली हायड्रोपोनिक शेती — मातीशिवाय, स्वच्छ आणि आधुनिक पद्धतीची शेती. या नव्या पद्धतीत कोथिंबिरीसारखी साधी भाजीही एक फायदेशीर व्यवसाय बनू शकते, हे आज अनेक तरुण सिद्ध करत आहेत.
हायड्रोपोनिक पद्धतीत मातीचा वापर होत नाही. त्याऐवजी पाण्यात विरघळवलेल्या पोषक द्रव्यांमधून झाडांची वाढ केली जाते. कोथिंबिरीच्या बिया हलक्या ठेचून ट्रेमध्ये किंवा पाईपमध्ये पेरल्या जातात आणि पाण्याच्या योग्य प्रवाहात ठेवल्या जातात. काही दिवसांतच त्यांना पालवी फुटते, आणि साधारण पंचवीस ते तीस दिवसांत हिरवीगार, ताजी कोथिंबीर कापणीसाठी तयार होते. या संपूर्ण प्रक्रियेत स्वच्छता आणि अचूकता यांना खूप महत्त्व असते.
या व्यवसायासाठी फार मोठ्या जमिनीची गरज नसते. घराच्या छतावर, छोट्या शेडनेट हाऊसमध्ये किंवा एखाद्या बंद जागेतही ही शेती करता येते. सुरुवातीला शंभर ते पाचशे चौ. फूट जागा पुरेशी ठरते. थोडेसे भांडवल जसे किम ट्रे, पाण्याची टाकी, पंप, पोषक द्रव्ये आणि बियाणे — यासाठी लागते. साधारण तीस ते सत्तर हजार रुपयांमध्ये एक छोटेखानी प्रकल्प उभा करता येतो. एकदा व्यवस्था तयार झाली की, पुढील उत्पादन प्रक्रिया सुलभ होते.
उत्पादनाच्या दृष्टीने पाहिले, तर छोट्याशा जागेतही चांगले उत्पन्न मिळू शकते. शंभर चौ. फूट जागेत एका महिन्यात दोन सायकलमध्ये चाळीस ते साठ किलो कोथिंबीर मिळू शकते. हायड्रोपोनिक कोथिंबीर स्वच्छ, रसायनमुक्त आणि आकर्षक असल्याने बाजारात तिला चांगली मागणी असते. स्थानिक भाजी मंडई, हॉटेल्स, केटरिंग व्यवसाय किंवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून तिची विक्री करता येते. योग्य नियोजन केल्यास या व्यवसायातून नियमित आणि समाधानकारक नफा मिळू शकतो.
हायड्रोपोनिक कोथिंबीर आपल्या घरगुती वापरासाठी सुद्धा उगवता येते. यासाठी एक प्लास्टिकची जाळीदार छोटी टोपली, ती बसेल असा खोल प्लास्टिकचा डबा किंवा बालदी, पाणी आणि धणे एवढेच लागणार आहे. प्रत्यक धण्याचे दोन भाग होतील असे थोडे ठेचून, भिजवून एका रुमालात रात्रभर बांधून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे धणे टोपलीवर पेरा. बादली भरून पाणी घ्या. या बादलीच्या तोंडावर टोपली अशी ठेवा की तिचा फक्त तळच बादलीत बुडेल आणि ती तशीच राहू द्या. काही दिवसातच तुमच्या टोपलीत कोथिंबीर येईल ही तुम्ही वरून कपून स्वयंपाकाला वापरू शकता.
हायड्रोपोनिक कोथिंबीर लागवड म्हणजे केवळ शेती नाही, तर आधुनिकतेकडे टाकलेले एक पाऊल आहे. कमी जागा, कमी पाणी आणि अधिक उत्पादन या तत्त्वांवर उभी असलेली ही शेती भविष्यातील दिशादर्शक ठरू शकते. थोडी जिद्द, थोडे ज्ञान आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर कोणताही तरुण किंवा उद्योजक हा व्यवसाय उभा करू शकतो. हिरव्या कोथिंबिरीच्या सुगंधासोबतच यशाची चाहूलही मग आपोआप दरवळू लागते