समृद्धी महामार्गावर प्रवाशांचा खोळंबा
समृद्धी महामार्ग महामार्गावर शहापूर तालुक्यातील कोळकेवाडी आणि खुटघर टोल नाक्याच्या परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर, मार्ग न समजल्याने अनेक वाहनचालक चक्क उलट्या दिशेने प्रवास करत असून, यामुळे महामार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे.
समृद्धी महामार्गावरील खुटघर टोल नाक्याच्या हद्दीत प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना नेमके कोणत्या दिशेला जायचे, याचे स्पष्ट मार्गदर्शन करणारे फलक उपलब्ध नाहीत. दिशादर्शक नसल्यामुळे बाहेरून येणारे नवीन वाहनचालक गोंधळात पडतात. या गोंधळामुळे अनेकदा वाहने उलट्या दिशेने धावताना दिसतात. ताशी एकशे वीस किमी वेगाने वाहने धावत असलेल्या या महामार्गावर उलट्या दिशेने येणारे वाहन म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. शहापूरच्या बाजूने असलेले विद्युत खांब सुरू असले, तरी मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लाईट बंद असल्याचे दिसून आले आहे. रात्रीच्या अंधारात रस्ता आणि दिशा समजत नसल्याने अपघाताची शक्यता कैक पटीने वाढली आहे. समृद्धी महामार्ग हा आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असल्याचा दावा केला जात असला, तरी मूलभूत सुविधांबाबत मात्र प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष वेधले आहे. महामार्गावर दिशादर्शक फलक लावणे आणि प्रकाश व्यवस्था सुरळीत ठेवणे ही रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र, खुटघर टोल परिसरात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. योग्य नियोजनाअभावी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शहापूर आणि मुरबाड परिसरातील नागरिकांनी आणि नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. खुटघर टोल नाका आणि इतर महत्त्वाच्या वळणांवर मोठे आणि रात्री चमकणारे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. मुरबाड बाजूची बंद पडलेली प्रकाश व्यवस्था तातडीने दुरुस्त करून रात्रीचा प्रवास सुरक्षित करावा. भविष्यात येथे कोणताही मोठा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची आणि कंत्राटदाराची असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.