खडकवासला – फुरसुंगी कालवा प्रकल्पाला गती
पुणे जिल्ह्यातील शेती व शहरी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या खडकवासला ते फुरसुंगी या भूमिगत बंद कालवा प्रकल्पाच्या कामाला आता चांगली गती मिळाली आहे. खडकवासला येथून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून पुणे शहराची वाढती पाण्याची गरज भागविणे आणि वारंवार फुटणाऱ्या उघड्या कालव्यांमुळे होणारे नुकसान टाळणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अठ्ठावीस किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या तीन किलोमीटरचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित पंचवीस किलोमीटरचे काम तांत्रिक आव्हाने पार करून पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. संपूर्ण प्रकल्प नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या बंद भूमिगत कालव्यामुळे बाष्पीभवन आणि गळती थांबणार असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. उघड्या कालव्यामुळे पाण्यात कचरा टाकणे, प्रदूषण आणि अनधिकृत पाणीउपसा यांसारख्या गंभीर समस्या सातत्याने निर्माण होत होत्या. आता बंद नलिकेमुळे शुद्ध पाणी थेट फुरसुंगीपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
कालवा फुटण्याच्या संकटातून परिसरातील नागरिकांची कायमस्वरूपी सुटका होणार असल्याने हा प्रकल्प स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या उघड्या कालव्यामुळे वेळोवेळी कालवा फुटण्याचे प्रकार घडत असत, ज्यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होत होते. भूमिगत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या समस्येवर कायमची मात करता येणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा उघडा कालवा ज्या जागेवरून जातो ती जागा मोकळी होणार आहे. या मोकळ्या झालेल्या जागेचा वापर रस्तेनिर्मितीसाठी केल्यास पुणे शहरातील, विशेषतः सिंहगड रस्ता आणि त्या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनेच नव्हे, तर शहरी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.