दिवा – चिपळूण मेमू रेल्वे एक मेपासून सुरू
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष सेवा 1 मे ते 7 जून या कालावधीत उपलब्ध असेल. प्रामुख्याने शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही अनारक्षित रेल्वे गाडी सुरू होत असून त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे.
ही विशेष मेमू रेल्वे आठवड्यातून तीन दिवस — शुक्रवार, शनिवार आणि रविवार — धावणार आहे. चिपळूण ते दिवा या दिशेने (गाडी क्रमांक शून्य एक एक सहा शून्य) ही रेल्वे दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी दिवा जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दिवा ते चिपळूण (गाडी क्रमांक शून्य एक एक पाच नऊ) ही रेल्वे रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी चिपळूणला पोहोचेल.
महिनाभराच्या कालावधीत दोन्ही बाजूंकडून एकूण छत्तीस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आठ डब्यांची ही मेमू रेल्वे सर्व स्थानकांवर थांबणार असून यामध्ये तेवीस रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या विशेष रेल्वेमुळे कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
दिवा-चिपळूण विशेष मेमू रेल्वे अंजनी, खेड, कळंबणी बुद्रूक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आप्टा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या तेवीस रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. यामुळे या मार्गावरील सर्व प्रमुख व छोट्या स्थानकांवरील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांना असणारी प्रचंड प्रतीक्षा यादी पाहता ही अनारक्षित मेमू सेवा प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र डब्यांची संख्या केवळ आठ असल्याने प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार ही सोय पुरेशी ठरेल का, असा प्रश्नही काही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.