बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचे लोकार्पण
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारलेल्या मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण एक मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. खोपोली येथील पूल क्रमांक एकाजवळ हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. या प्रकल्पाला आता मिसिंग लिंक नाही तर कनेक्टिंग लिंक म्हणावे असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर काही तासांतच ही मार्गिका सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
या मार्गामुळे खोपोली ते कुसगाव (लोणावळा) दरम्यानचा प्रवास थेट आणि सुसंगत झाला आहे. यामुळे पूर्वीच्या डोंगराळ आणि अवघड मार्गावर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली असून वाहतुकीची गती आणि कार्यक्षमता वाढणार आहे. यासोबतच इंधनाची बचत आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे. शिवाय मुंबई–पुणे प्रवासात सुमारे तीस मिनिटांची बचत होणार असून घाटातील वळणावळणाचा धोकादायक प्रवास आता प्रवाशांना टाळता येणार आहे.
या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील एका बोगद्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे याची लांबी आठ पूर्णांक सात किलोमीटर तर रुंदी तेवीस पूर्णांक पंचाहत्तर मीटर इतकी आहे. या बोगद्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक तीनशे मीटरवर आपत्कालीन मार्ग, आगप्रतिबंधक व्यवस्था आणि प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. या बोगद्यात दोन्ही बाजूंना चार-चार मार्गिका देण्यात आल्या आहेत. यामुळे घाटातील कठीण व वळणदार रस्ते टाळून आता वाहनधारकांना सरळ आणि वेगवान मार्ग उपलब्ध झाला आहे. कठीण डोंगराळ भूप्रदेशात आणि लोणावळा तलावाच्या खालून तयार करण्यात आलेला हा बोगदा भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्भुत कामगिरी मानली जात आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असून भविष्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी तो प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि काटेकोर नियोजन यांच्या साहाय्याने हा बोगदा उभारण्यात आला असून तो अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.
हा प्रकल्प सुरुवातीला 2021 र्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे त्यास काहीसा विलंब झाला. अखेर 2019 पासून सुरू झालेल्या या महाकाय कामाचा समारोप होऊन महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा मार्ग जनतेच्या सेवेत दाखल झाला आहे. या ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई आणि पुणे यांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः खंडाळा घाटातील वळणावळणाचा आणि वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा सुमारे तीस ते चाळीस मिनिटांचा वेळ वाचणार असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.