
मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आशयघन आणि सामाजिक विषयांच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच परंपरेला पुढे नेणारा आणि एका अत्यंत धाडसी विषयाला हात घालणारा ‘बाप्या’ हा चित्रपट येत्या आज १५ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून. कोकणच्या निसर्गरम्य आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारलेला असून, तो मानवी मनातील द्वंद्व आणि अस्तित्वाच्या शोधाची एक संवेदनशील गाथा मांडतो.
या चित्रपटाचे मुख्य सूत्र म्हणजे स्वतःची खरी ओळख स्वीकारण्याचे धाडस आणि त्यासाठी द्यावा लागणारा लढा. ही कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शैलजा नावाच्या स्त्रीची आहे, जिला आपल्या लैंगिक ओळखीबद्दल (Gender Identity) मनात अनेक प्रश्न आहेत. स्त्री म्हणून वावरतानाही स्वतःच्या शरीरात परकेपणा जाणवणाऱ्या शैलजाचा ‘शैलजा ते शैलेश’ हा ट्रान्समॅन बनण्याचा प्रवास अत्यंत भावनिक आणि संघर्षाचा आहे. कोकणसारख्या परंपराप्रिय भागात राहून आपल्या मनातील जाणिवांना वाट करून देणे आणि लिंगबदलाचा धाडसी निर्णय घेणे, हे कोणत्याही व्यक्तीसाठी किती आव्हानात्मक असू शकते, याचे वास्तववादी चित्रण दिग्दर्शक समीर तिवारी यांनी या चित्रपटात केले आहे.
अभिनयाच्या बाबतीत या चित्रपटाने एक मोठी उंची गाठली आहे. अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने शैलजा आणि शैलेश अशा दोन्ही छटा अत्यंत ताकदीने आणि प्रामाणिकपणे पडद्यावर जिवंत केल्या आहेत. तिच्या डोळ्यांतील भाव आणि बदलत्या देहबोलीतून तिने एका ट्रान्समॅनचा अंतर्गत संघर्ष आणि शारीरिक-मानसिक बदल अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत. तिला राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी यांची मोलाची साथ लाभली असून, त्यांनी शैलजाच्या पतीची भूमिका साकारली आहे. एका बाजूला पत्नीबद्दल असलेले प्रेम आणि दुसऱ्या बाजूला तिच्या या निर्णयामुळे समाजात आणि नात्यात निर्माण झालेली उलथापालथ, अशा कात्रीत अडकलेल्या पतीची भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या खास शैलीत मांडली आहे. चित्रपटाचे लेखन विक्रांत काटकर, प्रीती नाईर आणि निखिल अशोक पालांडे यांनी केले असून, संवादांमधील सहजता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.
‘बाप्या’ हा चित्रपट केवळ एक गंभीर ड्रामा म्हणून न राहता, त्यात कोकणी संस्कृतीतील विनोद आणि मानवी नातेसंबंधांमधील ओलावाही पाहायला मिळतो. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF 2026) मिळालेली दाद या चित्रपटाच्या गुणवत्तेची मोठी साक्ष आहे. हा चित्रपट मानवी हक्क आणि ‘एलजीबीटीक्यू’ (LGBTQ+) समुदायाच्या प्रश्नांवर अत्यंत संवेदनशीलपणे विचार करायला लावतो. बदलाला स्वीकारू पाहणाऱ्या समाजाची ही प्रेरणादायी गोष्ट मोठ्या पडद्यावर नक्कीच पाहण्यासारखी आहे.