
महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने भारताच्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका संघटना) अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स महिला कार्यगटाची दुसरी पूर्वतयारी बैठक आभासी (ऑनलाईन) माध्यमातून पार पडली. ही बैठक २२ मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्षस्थान महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी भूषविले. त्यांनी उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करताना ब्रिक्स राष्ट्रांमधील सातत्यपूर्ण सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची ‘लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता घडविणे’ ही संकल्पना पुढे नेण्यासाठी सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
बैठकीदरम्यान ब्रिक्स महिला मंत्रिस्तरीय बैठक ८ आणि ९ जुलै २०२६ रोजी केरळमधील कोची येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या बैठकीत महिलांच्या आर्थिक सहभाग, संगणकीय (डिजिटल) सक्षमीकरण आणि उद्योजकता वाढीसाठी विविध प्रस्तावांवर पुढील चर्चा होणार आहे. सदस्य राष्ट्रांनी आगामी शिखर परिषदेसाठी आवश्यक समन्वय वाढविण्याचेही ठरविले.
दरम्यान २२ मे रोजी झालेल्या बैठकीत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांनी बहुपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत तसेच महत्त्वाच्या प्राधान्य क्षेत्रांवर एकमत निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. विशेषतः महिलांच्या संगणकीय (डिजिटल) आणि आर्थिक समावेशनासोबत उद्योजकतेला चालना देण्यासाठी सर्वोत्तम कार्यपद्धतींचे संकलन आणि क्षमता विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. विविध देशांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी संयुक्त उपक्रम राबविण्याची तयारी दर्शविली.
प्रारंभीच्या भाषणात अनिल मलिक यांनी भारताची बांधिलकी पुन्हा स्पष्ट करत रचनात्मक संवाद, परस्पर शिक्षण आणि परिणामाभिमुख सहकार्य यांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. ब्रिक्स देशांमधील चर्चा केवळ विचारमंथनापुरती मर्यादित न राहता त्यातून ठोस कृती आराखडे तयार झाले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यापक ब्रिक्स कार्यक्रमपत्रिकेला बळ देण्यासाठी कृतीशील निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीच्या अखेरीस तांत्रिक सल्लामसलत, संयुक्त उपक्रम आणि सातत्यपूर्ण संवादाच्या माध्यमातून पुढील सहकार्य सुरू ठेवण्यावर सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये सहमती झाली. ब्रिक्स समूहातील महिलांच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. भारताच्या अध्यक्षतेखालील या बैठकीमुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ब्रिक्स राष्ट्रांमध्ये नवे सहकार्याचे दालन खुले झाल्याचे मानले जात आहे.