
उत्तर गोव्यातील आश्वे आणि मांद्रे सागरकिनारे देशी-विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. आश्वे किनारा हा उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्याचा एक मोठा भाग आहे. हा भाग मोरजी किनाऱ्यापासून पुढे सुरू होतो. आश्वे, मांद्रेनंतर पुढे हरमल किनाऱ्याकडे जातो. आश्वे हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. याच्या मागील बाजूस सुंदर पामची झाडे आहेत. समुद्रकिनाऱ्यावर अनेक शॅक आहेत. दुर्दैवाने, वाळूमुळे बरेच खडक वर आले आहेत. त्यामुळे तो पूर्वीसारखा सुंदर नाही; परंतु तरीही मनात भरतोच.
इतर किनाऱ्यांपेक्षा येथे शांतता अनुभवता येते. शांत समुद्र, सर्वोत्कृष्ट फ्रूट सॅलड हवे असल्यास या किनाऱ्यावर जावे. मांद्रे किनाराही नितांतसुंदर आहे. येथे कासव संवर्धन मोहीम सुरू असल्याने फारसे शॅक्स नाहीत. तर हे दोन्ही किनारे पेडणे तालुक्यात आहेत. मनमोहकता व शांतता प्रदान करणाऱ्या या किनाऱ्यांवर जाण्यासाठी विमानमार्गे प्रवास केल्यास मोपा विमानतळ जवळ आहे. रेल्वेने प्रवास केल्यास पेडणे, थिवी रेल्वेस्थानकावर उतरावे लागेल. मोरजी किनारा इथून जवळच असून तेथे विदेशी पर्यटक जास्त असतात. आता आश्वे-मांद्रे किनाऱ्याच्या दिशेने पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.