तुफान गारपिटीमुळे शेतीचे नुकसान
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपिटीने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. अवघ्या काही तासांत झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या गारपिटीमुळे कराड दक्षिणमधील उंडाळे, येळगाव, तुळसण आणि इतर परिसरातील उभी पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत. काढणीला आलेला गहू, ज्वारी आणि हरभरा ही पिके भुईसपाट झाली आहेत. अनेक ठिकाणी गव्हाच्या ओंब्या गारांच्या मारामुळे तुटून पडल्या आहेत. जनावरांसाठी असलेला चारा आणि मोठ्या कष्टाने जोपासलेला भाजीपालाही या पावसाने पूर्णपणे झोडपून काढला आहे. सध्या आंब्याचा मोहर आणि फळे लागण्याचा काळ असताना झालेल्या या गारपिटीमुळे आंब्याचा मोहोर गळून पडला आहे, ज्याचा मोठा आर्थिक फटका बागायतदारांना बसणार आहे. फक्त शेतीच नव्हे, तर या नैसर्गिक आपत्तीने पशुधनावरही काळाचा घाला घातला आहे. शेडची छप्पर उडाल्यामुळे आणि भिंती पडल्यामुळे गोठ्यात बांधलेली जनावरे जखमी झाली आहेत.
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणचे जुने वृक्ष उन्मळून पडले आहेत. यामुळे वीजवाहक तारा तुटून अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते झाडे पडल्यामुळे काही काळ बंद झाले होते. रस्ते मोकळे करण्याचे हे काम प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. मार्च-एप्रिल महिन्यातील हे अवकाळी संकट शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित होते. कधी नव्हे एवढी मोठी गारपीट या भागात झाली, अशा भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. हातात आलेली पिके डोळ्यादेखत नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. यावर शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.