
भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक ऐतिहासिक प्रकल्प दिल्ली – डेहराडून द्रुतगती मार्ग खुला झाला आहे. सुमारे दोनशे तेरा किलोमीटर लांबीचा हा मार्ग केवळ प्रवासाचा वेळ वाचवणारा नसून, पर्यावरणाचे रक्षण करणारा एक जागतिक नमुना ठरला आहे. या द्रुतगती मार्गाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यातील बारा किलोमीटर लांबीची उन्नत वन्यजीव मार्गिका, जी आशियातील अशा प्रकारची सर्वात लांब मार्गिका मानली जात आहे. या प्रकल्पामुळे दिल्ली ते डेहराडून हे अंतर पार करण्यासाठी लागणारा सहा तासांचा वेळ आता केवळ दोन पूर्णांक पाच तासांवर आला आहे.
दिल्ली – डेहराडून महामार्ग हा उत्तराखंडमधील राजाजी राष्ट्रीय उद्यानाच्या संवेदनशील भागातून आणि शिवालिक टेकड्यांमधून जातो. हा भाग हत्ती, वाघ, बिबट्या आणि इतर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात अडथळा येऊ नये, म्हणून सरकारने येथे अनोखे अभियांत्रिकी कौशल्य वापरले आहे. हा बारा किलोमीटरचा रस्ता खांबांवर बांधण्यात आला आहे, जेणेकरून त्याखालून वन्यप्राणी मुक्तपणे वावरू शकतील. लहान आणि मोठ्या प्राण्यांसाठी स्वतंत्र अंडरपासेस आणि हत्तींसाठी विशेष दोनशे मीटरचे दोन उन्नत मार्ग तयार करण्यात आले आहेत. डेहराडून जवळील प्रसिद्ध डाट काली मंदिरापाशी तीनशे सत्तर मीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला असून, त्यामुळे वन्यजीवांना त्रास न होता रस्ता पार करता येईल. सुमारे बारा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधलेला हा सहा पदरी द्रुतगती मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यांना जोडतो. या मार्गामुळे केवळ पर्यटनच नाही, तर उत्तर भारतातील व्यापारालाही मोठी गती मिळणार आहे. या रस्त्यावर कारसाठी शंभर किमी आणि ट्रकसाठी ऐंशी किमी अशी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी येथे प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आली आहे. प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी बारा ठिकाणी विशेष सोयी-सुविधा आणि उपाहारगृहे उभारली आहेत. उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी सहारणपूर येथे या वन्यजीव मार्गिकेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी डाट काली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हा प्रकल्प आधुनिक भारताच्या पुढच्या पिढीतील पायाभूत सुविधेचे प्रतीक आहे. यात वेगासोबतच पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे, ज्यामुळे शाश्वत विकासाचे स्वप्न पूर्ण होईल.
भारतीय वन्यजीव संस्थेच्या प्राथमिक अभ्यासानुसार, हा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच हत्ती, सांबर आणि ठिपके असलेल्या हरिणांनी या भुयारी मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, हे या प्रकल्पाच्या यश आहे. या द्रुतगती मार्गामुळे उत्तराखंडमधील पर्यटन स्थळे जसे की हरिद्वार, ऋषिकेश आणि डेहराडून येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे विकेंड पर्यटनालाही चालना मिळेल, ज्यातून स्थानिक रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.