
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. इराणवरील सुरुवातीच्या हल्ल्यांमध्ये ब्रिटनने अमेरिकेला साथ न दिल्यामुळे नाराज असलेल्या ट्रम्प यांनी, आम्ही युद्ध जिंकल्यानंतर सहभागी होणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही, अशा शब्दांत स्टार्मर यांना लक्ष्य केले आहे.
इराणच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेमुळे निर्माण झालेला धोका पाहता, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लष्करी कारवाई सुरू केली आहे. मात्र, या सुरुवातीच्या हल्ल्यांच्या वेळी अमेरिकेला ब्रिटनच्या लष्करी तळांचा वापर करू द्यायला पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी सुरुवातीला नकार दिला होता. स्टार्मर यांचा असा तर्क होता की, कोणतीही लष्करी कारवाई कायदेशीर आणि नियोजित असणे आवश्यक आहे. ही कृती ट्रम्प यांना अजिबात आवडली नाही.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. युनायटेड किंगडम हा आपला एकेकाळचा महान मित्र, कदाचित सर्वांत महान मित्र, आता मध्यपूर्वेकडे दोन विमानवाहू नौका पाठवण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. हे ठीक आहे, पंतप्रधान स्टार्मर, आम्हाला त्यांची आता गरज नाही. पण आम्ही हे लक्षात ठेवू. युद्ध जिंकल्यानंतर त्यात सामील होणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही, असे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी केवळ लष्करी मदतीवरच नव्हे, तर स्टार्मर यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी म्हटले होते की, आम्ही ज्यांच्याशी व्यवहार करत आहोत, ते विन्स्टन चर्चिल नाहीत. या विधानामुळे अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक विशेष संबंध तणावाखाली आल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनने नंतर अमेरिकेला विशिष्ट ‘संरक्षणात्मक कारवायांसाठी’ तळांचा वापर करण्याची परवानगी दिली असली, तरी ट्रम्प यांच्या मते ही मदत खूप उशिरा मिळाली. दुसरीकडे, पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आणि माझ्या मूल्ये आणि तत्त्वांवर ठाम राहणे ही माझी जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. इराणने आखाती देशांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर परिस्थिती बदलली असून, आता ब्रिटन आपल्या मित्रराष्ट्रांच्या संरक्षणासाठी मदत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्टार्मर यांनी असेही म्हटले आहे की, ब्रिटन कोणत्याही मोठ्या युद्धात ओढले जाण्यास इच्छुक नाही, परंतु आपल्या नागरिकांचे आणि मित्रराष्ट्रांचे रक्षण करण्यासाठी ब्रिटनची विमाने आणि युद्धनौका तैनात आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनीही अप्रत्यक्षपणे ब्रिटनच्या सुरुवातीच्या भूमिकेवर टीका केली आहे. जेव्हा मित्र देशाला तुमची गरज असते, तेव्हा ते तिथे नसतील, तर अशा मित्रत्वाचा काय उपयोग, असे त्यांनी एका सुरक्षा परिषदेत म्हटले होते. ट्रम्प यांचे आक्रमक धोरण आणि स्टार्मर यांची सावध भूमिका यामुळे येणाऱ्या काळात या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध कसे राहतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.