दुबई – मुंबई प्रवास महागला –  अठरा हजारांचे तिकीट ऐंशी हजारांवर

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे मध्य-पूर्व आणि आखाती देशांतील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले आहे. या युद्धाच्या छायेमुळे दुबईमध्ये अडकलेले नाशिकमधील अनेक विद्यार्थी आणि पर्यटक मायदेशी परतण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, या परिस्थितीचा गैरफायदा घेत विमान कंपन्यांनी तिकीटांचे दर वाढवले आहेत. यामुळे सामान्य विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

इराणने आखाती देशांना लक्ष्य केल्याने अनेक भागांतील विमानसेवा काही दिवस ठप्प झाली होती. आता ही सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी, युद्धाच्या सावटातून बाहेर पडण्यासाठी भारतीय नागरिकांची धावपळ सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोनशे साठपेक्षा जास्त नागरिक या भागात अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. मात्र, विमान कंपन्यांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन तिकीटांचे भाव चार ते पाच पटीने वाढवले आहेत.

दुबईत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना या वाढीव दरांचा सर्वाधिक फटका बसत आहे. लासलगाव येथील अर्जुन होळकर, दुबईहून नाशिकला परतला. त्याने सांगितले की, एरव्ही अठरा ते बावीस हजारांत मिळणारे तिकीट सध्या ऐंशी हजार रुपयांपर्यंत गेले आहे. अर्णव कुशारे या विद्यार्थ्यालाही अशीच स्थिती अनुभवायला मिळाली. त्याला तिकीटासाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये मोजावे लागले आहेत. युद्धाच्या परिस्थितीत पुढे काय होईल हे माहीत नसल्याने, धोका पत्करण्यापेक्षा महागड्या दरात तिकीट घेऊन मायदेशी परतणे आम्ही पसंत केले, अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी दुबईतच राहणे पसंत केले आहे, कारण तिथे सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. विद्यापीठाचे काम ऑनलाईन सुरू झाले आहे. तरीही पालकांच्या चिंतेमुळे अनेक विद्यार्थी घरी परतत आहेत. याव्यतिरिक्त, दुबईला सहलीसाठी गेलेले काही पर्यटकही या संघर्षामुळे हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत आणि परतीच्या प्रवासासाठी त्यांनाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भारतीय शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे. खासदार आणि लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहून विमान कंपन्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण आणण्याचे आवाहन केले आहे. या कठीण काळात नागरिकांची होणारी ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,582 वेळा पाहिलं