भारतासह पाच देशांसाठी होर्मुझ मार्ग खुला

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी भारतासह जगातील केवळ पाच देशांना विशेष परवानगी दिली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणने या मार्गावर कडक निर्बंध लादलेले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा सुरक्षेचा कणा मानला जातो. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे वीस ते तीस टक्के व्यापार याच अरुंद मार्गातून होतो. इराणने यापूर्वी हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, भारताला मिळालेल्या या सुरक्षित मार्गामुळे भारतीय तेल कंपन्यांना आणि आयातदारांना दिलासा मिळाला आहे.

इराणने केवळ भारत, चीन, रशिया, ओमान आणि कतार या पाच देशांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची मुभा दिली आहे. या निवडीमागे इराणचे या देशांशी असलेले मित्रत्वाचे संबंध आणि भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर जपलेली तटस्थ भूमिका कारणीभूत असल्याचे मानले जाते. भारताचा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधून होतो. ही सर्व जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतूनच भारतात येतात. जर हा मार्ग बंद झाला असता, तर भारताला आफ्रिकेला वळसा घालून दीर्घ मार्गाने तेल आणावे लागले असते, ज्यामुळे वाहतूक खर्च आणि इंधनाचे दर प्रचंड वाढले असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भारताने इराणमधील चाबहार बंदरात केलेली गुंतवणूक आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांमुळे इराणने भारताला हा विशेष दर्जा दिला आहे. भारत हा आमचा जुना आणि विश्वासू भागीदार आहे, त्यामुळे त्यांच्या व्यापारी हितांना बाधा पोहोचणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,693 वेळा पाहिलं