फारुख अब्दुल्ला जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री जम्मूमध्ये जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. एका लग्नाच्या कार्यक्रमातून बाहेर पडत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. मात्र, त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

फारुख अब्दुल्ला हे जम्मूच्या ग्रेटर कैलास परिसरातील रॉयल पार्क येथे एका लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम संपवून रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ते बाहेर पडत असताना, अचानक एका व्यक्तीने मागून येऊन त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. मात्र, फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अत्यंत चपळाई दाखवत हल्लेखोराला तातडीने पकडले आणि त्याच्याकडून शस्त्र हिसकावून घेतले. या झटापटीत हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले असून, सुदैवाने या घटनेत फारुख अब्दुल्ला किंवा इतर कुणीही जखमी झाले नाही. पकडण्यात आलेल्या हल्लेखोराची ओळख कमल सिंग जम्वाल अशी पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर अंमली पदार्थाच्या किंवा दारूच्या नशेत होता. चौकशीदरम्यान, त्याने धक्कादायक कबुली दिली की, तो गेल्या वीस वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याच्या संधीच्या शोधात होता. आज त्याला ती संधी मिळाली, परंतु नशिबाने अब्दुल्ला वाचले, असेही त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. पोलिसांनी त्याच्याकडील परवानाधारक पिस्तूल जप्त केले असून, यामागे कोणताही दहशतवादी कट नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि फारुख अब्दुल्ला यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, देव दयाळू आहे, माझे वडील थोडक्यात बचावले आहेत. मात्र, झेड प्लस सुरक्षा असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळ एखादी व्यक्ती हत्यार घेऊन कशी पोहोचू शकते, हा मोठा प्रश्न आहे. या घटनेत सुरक्षेतील मोठी त्रुटी दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी, जे स्वतः त्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते, त्यांनीही सुरक्षेतील या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतके वरिष्ठ नेते एका कार्यक्रमात उपस्थित असताना तिथे स्थानिक पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा का तैनात नव्हती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. हल्लेखोराचा नेमका उद्देश काय होता आणि त्याने इतके दिवस हे कृत्य का लांबवले, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संबंधित यंत्रणांना जबाबदार धरण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
7,849 वेळा पाहिलं